लवकरच तरुणाईच्या भेटीला गुगलचे मोफत मॅसेजिंग ऍप

google
नवी दिल्ली – तरुणाईच्या पसंतीचे ऍप असलेले ‘व्हॉट्सऍप’ विकत घेण्याच्या शर्यतीत फेसबुकपेक्षा मागे पडल्यानंतर आता गुगल नवे मोबाइल मॅसेजिंग ऍप सादर करण्याच्या तयारीत आहे. गुगलतर्फे या मॅसेजिंग ऍपची सुरुवात भारत आणि इतर काही देशांमध्ये करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. मागील महिन्यात गुगलने कंपनीच्या उत्पादन तज्ञांना मॅसेजिंग ऍप आणि त्यासंबंधी गोष्टींवर अभ्यास करण्यासाठी भारतात पाठविले आहे. विशेष म्हणजे, या ऍपसाठी कोणतीही रक्कम चुकवावी लागणार नसल्याने गुगल आता व्हॉट्सऍपसमोर कितपत आव्हान उभे करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुगल मॅसेंजर देखील व्हॉट्सऍपसारखेच मोबाइल क्रमांकाशी निगडीत असणार आहे. सध्या तरी हे ऍप प्राथमिक अवस्थेत असून २०१५ साली हे ऍप बाजारात दाखल होणार आहे. तसेच गुगलच्या या मॅसेजिंग ऍपमध्ये भारतीय भाषांना अनुकूल प्रणाली देखील उपलब्ध असणार असून व्हॉईस टू टेक्स मॅसेजिंगची सुविधा देखील या ऍपमध्ये देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Leave a Comment