भारत दौर्‍यातून माघारी परतणार सुनील नरेन

sunil-narin
नवी दिल्ली – वेस्ट इंडिज संघाचा प्रमुख फिरकी गोलंदाज सुनील नरेनला विंडीज क्रिकेट मंडळाने भारत दौर्‍यातून माघारी बोलविले आहे. सध्या भारतात सुरु असलेल्या चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धेत नरेनच्या गोलंदाजी शैलीवर आक्षेप घेतल्याने त्याच्यावर बंदी घातली होती. त्यामुळे त्याच्या गोलंदाजी शैलीत सुधारणा करण्यास पुरेसा वेळ मिळावा, यासाठी विंडीज क्रिकेट मंडळाने त्याला मायदेशी बोलविले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमधील गोलंदाजांच्या यादीत दुसर्‍या स्थानी असलेला नरेन भारताविरुद्धच्या मालिकेत खेळू शकणार नाही.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०११ साली पदार्पण करणारा नरेन त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे जगातील अव्वल गोलंदाज म्हणून ओळखला जातो. पुढील वर्षी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये विश्वचषक स्पर्धा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर संघाच्या तयारीमध्ये नरेनवरील बंदीचा अडथळा येऊ नये, असा विंडीज क्रिकेट मंडळाचा प्रयत्न आहे. त्यामुळे लवकरात लवकर नरेनची गोलंदाजी शैली सुधारण्याकडे त्यांचा कल असणार आहे. यासंदर्भात मंडळाच्या निवड समितीचे अध्यक्ष क्लाईव्ह लॉईड म्हणाले की, भारतासारख्या महत्वाच्या दौर्‍यातून नरेनला परत बोलाविण्याचा निर्णय अवघड होता. संघातील सर्वोत्तम गोलंदाज दौर्‍यापूर्वीच संघातून बाहेर पडल्याचा मोठा फटका बसू शकतो. मात्र, आगामी स्पर्धांचा विचार करता हे क्रमप्राप्त आहे. संघाला हा अडथळा पार करावा लागेल. लवकरत नरेनच्या जागी बदली खेळाडूची घोषणा केली जाईल, असे ते म्हणाले.

Leave a Comment