पुन्हा युती होणे अशक्य – संजय राऊत

sanjay
रत्नागिरी : भाजपने विधानसभा निवडणुकीनंतर जागा कमी पडल्यास शिवसेनेची मदत घेऊ शकतो, असे स्पष्ट केल्यानंतर सेनेने मात्र हा प्रस्ताव धुडकावला असून रत्नागिरीत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कोणत्याही परिस्थितीत भाजपबरोबर पुन्हा युती करणार नाही असे स्पष्ट केले आहे.

युती तोडण्याच्या उद्देशाने भाजपचे काही नेते अफजलखानी विडा उचलून आल्यामुळे युती तुटली आणि मनही. म्हणूनच शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येण्याची शक्यता नाही, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

भाजपचे नितीन गडकरींनी यांनी एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिवसेना आणि भाजपची युती तुटली असली तरी निवडणुकीनंतर नव्याने काही समीकरणे जुळून येऊ शकतात असे सांगितले होते. तर रामदास आठवलेंनीही संख्याबळ कमी पडले, तर शिवसेनेला सोबत घेऊ असे म्हटले होते.

जनतेला युती कोणामुळे तुटली हे माहित असल्यामुळे युती तोडणाऱ्यांना महाराष्ट्रात भांडी घासायला लावू, असे म्हणत शिवसेनेने भाजपवर टीकेची तोफ डागली आहे. तसेच युती तोडण्यामागचा उद्देश भाजपने स्पष्ट करावा, असे आव्हानही संजय राऊत यांनी दिले आहे.

Leave a Comment