दस-याच्या मुहूर्तावर बाजारात खरीप कांद्याची आवक !

onion
नाशिक – नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजारामध्ये खरीप कांद्याची आवक होण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी मालेगाव तालुक्यातील उमराणे कृषी उत्पन्न बाजारात तीन हजार क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ऑक्टोबरच्या तिस-या आठवड्यापर्यंत मोठ्या प्रमाणावर खरीप कांद्याची आवक होईल.

सध्या कांद्याला सरासरी १९०० रुपये पप्रतिक्वटल असा भाव असून उन्हाळी कांद्याच्या तुलनेत तो ८०० रुपयांनी जास्त आहे. मात्र पुढील दोन सप्ताहात कांद्याची आवक वाढल्यास दर घसरतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. उन्हाळी कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणावर गारपीटीने खराब झाले आहे. त्यामुळे बाजारात उपलब्ध असलेला कांदा संपण्याच्या मार्गावर आहे. अशा वेळेला नवीन खरीप कांद्याची आवक झाल्याने ऐन दिवाळीत ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणणारा कांदा महागण्याची शक्यता राहिलेली नाही. उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील अधिका-यांनी सांगितले की, दस-याच्या मुहूर्तावर शेतक-यांनी कांदे विक्रीला सुरुवात केली आहे. सुमारे ३०० कांदा आवक झाली आहे.

घाऊक विक्रीमध्ये या कांद्याला १९०० रुपये कमाल तर ५०१ किमान भाव मिळाला आहे. लासलगाव बाजार समितीमध्ये उपलब्ध झालेल्या कांद्याबाबत बाजार समितीचे अध्यक्ष नाना पाटील यांनी सांगितले की, खरीप कांद्याची आवक झाली असली तरी आमच्याकडे मोठ्या प्रमाणावर उन्हाळी कांदा अद्याप शिल्लक आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यापर्यंत हा कांदा विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहे. मागील वर्षी उन्हाळी कांद्याचे केवळ १० टक्के चांगल्या अवस्थेत राहिले होते. त्यामुळे अर्धा सडलेला कांदा मातीमोल भावाने शेतक-यांना विकावा लागला होता. लासलगाव, पिंपळगाव, येवला या बाजार समित्या शुक्रवारी बंद असल्याने तेथे कांद्याची आवक होऊ शकलेली नाही.

Leave a Comment