ई-कॉमर्स कंपन्यांकडून देण्यात येणार्‍या खरेदी योजना बेकायदेशीर : कैट

shopping
नवी दिल्ली – ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपन्यांकडून दिवाळीच्या मुहूर्तावर ऑनलाइन खरेदी योजना जाहीर केल्या जात आहेत. या योजनांवर कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सतर्फे (कैट) प्रश्न उपस्थित करण्यात आला असून वाणिज्य मंत्री निर्मला सीतारमन यांनी ऑनलाइन शॉपिंगशी संबंधित ई-कॉमर्स कंपन्यांची व्यापार रणनीती आणि व्यापार करण्याची पद्धत यांची तपासणी करण्याची मागणी केली आहे. असे असले तरी, ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपन्यांनी मात्र, आपण नियमांनुसारच व्यापार करत असल्याचे सांगितले असल्याने हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

केंद्रीय वाणिज्य राज्यमंत्री निर्मला सीतारामन यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात कैटने मागणी केली आहे की, भारतात ई-कॉमर्स पद्धतीने व्यापार करत असलेल्या कंपन्यांची व्यापार करण्याची पद्धत तसेच व्यापार रणनीती यांची तपासणी केली पाहिजे. यासाठी विशेष तज्ज्ञांची एक कार्य समिती स्थापन केली पाहिजे. तसेच गरज भासल्यास कैट या कंपन्यांच्या विरोधात भारतीय स्पर्धा आयोगाकडे देखील तक्रार दाखल करेल, असे या निवेदनात सांगण्यात आले आहे. कैटच्या अंदाजानुसार, ई-कॉमर्स क्षेत्रातील व्यापारामुळे यंदाच्या वर्षी बाजारातील दुकानदारांना व्यापारात सुमारे ३० टक्के नुकसान सोसावे लागले आहे. त्यामुळे ई-कॉमर्स व्यापारातील गैरवाजवी पद्धतींना दूर केले पाहिजे आणि निरोगी व्यापारी वातावरण प्रस्थापित केले पाहिजे अशी मागणी या निवेदनाद्वारे कैटने सीतारमन यांच्याकडे केली आहे.

Leave a Comment