उच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतरही मोदींच्या प्रचारसभेची तयारी

modi3
औरंगाबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत असून आज मोदी यांची बीड व औरंगाबाद येथे सभा होणार आहे. औरंगाबादेतील गरवारे स्टेडियमवर सायंकाळी ४ वाजता प्रचारसभा होईल. गरवारे स्टेडियमचा वापर खेळाव्यतिरिक्त इतर कार्यक्रमांसाठी केला जाऊ नये, असे आदेश औरंगाबाद उच्च न्यायालयाने महापालिका प्रशासनास दिलेले असताना, महापालिकेने हे स्टेडियम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेसाठी दिल्यामुळे मोदींची प्रचारसभा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

२३ डिसेंबर २०१३ रोजी औरंगाबाद न्यायालयाचे न्यायमूर्ती रवींद्र बोर्डे व न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी खेळाव्यतिरिक्त इतर कुठल्याच कार्यक्रमांसाठी स्टेडियमच्या आतील भागात परवानगी दिली जाऊ नये, असे आदेश दिले होते. महापालिका प्रशासनाने एप्रिल २०१३ मध्ये एका लग्न समारंभासाठी स्टेडियम भाड्याने दिले होते. त्यानंतर स्टेडियमची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली. क्रिकेटच्या पिचवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले होते. एकदा पिचवर खड्डे पडले तर पिच एक महिना दुरुस्त होत नाही. मैदान अशा प्रकारे लग्न समारंभास भाड्याने दिले जाऊ नये यासाठी बसवराज जिबकाटे, संजय महामुनी, निशांत जैस्वाल, शेख समीर शेख पाशा यांनी महापालिका आयुक्तांकडे अर्ज सादर केला होता. यानंतरही मैदान लग्न समारंभासाठी भाड्याने देणे सुरूच होते.