पृथ्वीराज चव्हाण यांना विलासकाकांचे आव्हान

prithviraj-chvan
सातारा: सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण या विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात प्रथमच उतरलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची उमेदवारी आणि त्यांच्यासमोर असलेले विलासकाका उंडाळकर यांचे तगडे आव्हान; यामुळे या मतदारसंघात कडवी लढत होणार आहे.

या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी दीर्घकाळ केले आहे. विद्यमान आमदार विलासकाका उंडाळकर यांनीही अनेक वर्ष या मतदारसंघातून निवडून येत आहेत. या मतदारसंघात त्यांना मोठा जनाधार आहे. राजकीय कारकीर्दीत दीर्घकाळ दिल्लीच्या दरबारी राजकारणात रमलेले पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी प्रथमच विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी याच मतदारसंघाची निवड केली. मात्र विलासकाका उंडाळकर यांनी चव्हाण यांच्यासाठी हा बालेकिल्ला सोडण्यास ठाम नकार देऊन बंडाचा झेंडा उभारला असून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस ची साथ आहे. या दोन तगड्या उमेदवारांखेरीज दिवंगत मंत्री विलासराव देशमुख यांचे जावई डॉ. अतुल भोसले यांनीही भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मिळविली आहे. विकासाचा नारा देऊन त्यांनीही प्रचाराचा धडाका लावला आहे. या तगड्या उमेदवारांमुळे ही निवडणूक लक्षणीय ठरणार आहे.

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. सखरपट्ट्यात सहकारी साखर कारखाना हा राजकारणाचे प्रमुख केंद्र असतो. या मतदारसंघाचे बहुतेक क्षेत्र हे पाटील यांच्या आधिपत्याखालील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या अखत्यारीत येते. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मनोज घोरपडे आणि काँग्रेसचे धैर्यशील कदम यांनी कसोशीने प्रयत्न जरी ठेवले असले तरीही त्यामुळे पाटील यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहण्याची फारशी शक्यता नाही.

पाटण या मतदारसंघात पाटणकर आणि देसाई यांच्यात पारंपारिक लढत होत आली आहे. या वेळीही शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादी कडून विक्रमसिंह पाटणकर यांचे चिरंजीव सत्यजीतसिंह पाटणकर यांच्यात मुख्य लढत होणार आहे. काँग्रेसच्या वतीने हिंदुराव पाटील हे निवडणूक लढवीत असून आघाडी फुटल्याने पाटणकर यांची बाजू काहीशी कमकुवत झाली आहे. या मतदारसंघात भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार रिंगणात असले तरी त्यांची ताकद नगण्य आहे.

सातारा विधानसभा मतदारसंघात दीर्घकाळापासून भोसले घराण्याचे वर्चस्व आहे. अभयसिंहराजे भोसले यांचे चिरंजीव शिवेंद्रराजे हे या मतदारसंघातील विद्यमान आमदार असून यावेळीही ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवीत आहेत. छत्रपती उदयनमहाराज भोसले यांचा त्यांना पाठींबा असल्याने त्यांची बाजू अधिक बळकट झाली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असलेले दीपक पवार हे भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवीत आहेत; तर दगडू सकपाळ यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. काँग्रेसच्या वतीने रजनी पवार रिंगणात आहेत. मात्र या मतदारसंघात एकतर्फी लढत होण्याची चिन्ह आहेत.

कोरेगाव मतदारसंघात राष्ट्रवादीकडून पालकमंत्री शशिकांत शिंदे हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे एड. विजयराव कणसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संजय भगत , शिवसेनेचे हनुमंत चौरे हे प्रमुख उमेदवार निवडणूक लढवित आहेत. आघाडी तुटल्यामुळे होणारे मतविभाजन, पक्षातील अंतर्गत विरोध, कुटुंबियांवर होणारे आरोप या आव्हानांना शिंदे यांना सामोरे जावे लागणार आहे. मात्र त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेसचे एड. कणसे यांनाही पक्षांतर्गत गटबाजीला तोंड द्यावे लागणार आहे. मात्र मुख्य लढत या दोघांमध्येच होणार असून शिंदे यांचे पारडे काहीसे जड आहे.

वाई मतदारसंघाने सातत्याने काँग्रेसी विचारांची पाठराखण केली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांखेरीज इतरांना या मतदारसंघात फारसे स्थान नाही. मागच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार असलेले मदन पाटील यांचा राष्ट्रवादीचे बंडखोर मकरंद पाटील यांनी पराभव केला. या निवडणुकीत आघाडी तुटल्याने हेच उमेदवार पुन्हा अधिकृतपणे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष डी एम बावळेकर यांना शिवसेनेने; तर भाजपने पुरुषोत्तम जाधव यांना उमेदवारी दिली आहे. हे उमेदवार कोणाची किती मते खाणार; यावरच निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे.

Leave a Comment