हॉंगकॉंगला आंदोलन थांबवण्याचा चीनचा इशारा

china
लंडन – चीनी कम्युनिस्ट पक्षाने हॉंगकाँगमध्ये लोकशाही हक्कांसाठी आंदोलन करणा-या लोकशाहीवादी कार्यकर्त्यांना निर्वाणीचा इशारा दिला असून असेच जर तुमचे आंदोलन सुरु राहिले तर, कल्पनाही केली नसेल असे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा चीनी कम्युनिस्ट पार्टीने दिला आहे.

हा इशारा पक्षाचे मुखपत्र पीपल्स डेलीमधून देण्यात आला आहे. हॉंगकॉंगमध्ये सुरु असलेल्या या आंदोलनामुळे चीनचा संयम सुटत चालला आहे. आंदोलनकर्त्यांनी हॉंगकॉंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी लेऊंग चुन-यींग यांना आपल्या पदाचा राजीनामा देण्यासाठी गुरुवारपर्यंतची मुदत दिली आहे. लेऊंग यांनी राजीनामा दिला नाही तर, सरकारी इमारती ताब्यात घेण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

पीपल्स डेलीमधील संपादकीय सरकारी वृत्तवाहिनीवर वाचून दाखवण्यात आले. यामध्ये हॉंगकॉंगमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरकारकडून जे प्रयत्न करण्यात येत आहेत त्याला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

हॉंगकॉंगचे शेवटचे ब्रिटीश राज्यपाल लॉर्ड पॅटर्न यांनी बिजींगवर आपले वचन तोडत असल्याचा आरोप केला आहे. बिजींग वन कंट्री, टू सिस्टीम्स कराराचा भंग करत असल्याचा आरोप त्यांनी केला. १९९७ मध्ये ब्रिटनने हॉंगकॉंगचा ताबा चीनकडे सोपवला होता.