आता राजू शेट्टींवर शिवसेनेचे बाण!

raju-shetty
मुंबई- भाजपने महायुतीतील घटकपक्षांना विविध प्रलोभने दाखवून आपल्या जाळ्यात ओढल्याने शिवसेनेने सर्वप्रथम रामदास आठवले यांच्यावर हल्लाबोल केला. त्यानंतर बुधवारी महादेव जानकर व आज राजू शेट्टी यांना सेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून चांगलेच फैलावर घेतले आहे. मेटेंची ताकद, भूमिका मर्यादित असल्याने सेना त्यावर भाष्य करून मेटेंना महत्त्व देईल असे सध्यातरी वाटत नाही आहे. मात्र, आठवले, जानकर व राजू शेट्टींना सेनेने बोचरे सवाल उपस्थित करून त्यांच्या पाठीराख्यांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे. सेना त्यात यशस्वी होत असल्यानेच शिवसेना ‘सामना’तून या नेत्यांवर बाण सोडत आहे.

सर्व घटकपक्षांना भाजपने २५ वर्षाची शिवसेनेसोबतची युती तोडल्यानंतर विविध सत्तेची पदे देण्याचे आश्वासन देत आपल्याकडे खेचून घेतल्यानंतर सेनेने आठवले, जानकरांना लक्ष्य केले. आता राजू शेट्टींना लक्ष्य केले आहे. आजच्या अग्रलेखात म्हटले आहे की, राजू शेट्टी स्वत: ‘रालोआ’वर तोंडसुख घेतात व त्याच तोंडाने शिवसेनेने ‘रालोआ’तून बाहेर पडू नये असा सल्ला शिवसेनेला देतात, हे काय गौडबंगाल आहे? शेट्टी यांनी मोदी सरकारच्या विरोधात गर्जना केल्या तेव्हा राज्यातील भाजप नेत्यांनी त्यांना फटकारले होते, पण शेवटी काय? बिळात नेण्यासाठी चार शेंगा त्यांच्याही तोंडी लागल्याने महाराष्ट्रातील समस्त शेतकरी वर्गाचे त्यांच्या लेखी भले झाले असे मानायला हरकत नाही, अशी टीका केली आहे.

Leave a Comment