मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीवर शिवसेनेचा आक्षेप!

prithviraj-chavhan
मुंबई – मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसतर्फे महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाने जाहिराती प्रसिद्ध करण्यात येत असून शिवसेना उमेदवार रवींद्र वायकर यांनी या जाहिरातींविरोधात आक्षेप नोंदवला आहे. वायकर यांनी निवडणूक आयोगाकडे पत्रकाद्वारे आक्षेप नोंदवला आहे. तसेच मुख्यमत्र्यांच्या जाहिरातीवर योग्य ती कारवाई करण्याची मागणीही वायकर यांनी केली आहे.

राज्यात विधानसभेसाठी युती आणि आघाडी फुटल्यानंतर पंचरंगी लढत रंगली आहे. अशात मुख्यमंत्रीपदाचा मानकरी कोण ठरणार यासाठीही राजकीय पक्षात जंगी लढाई सुरू आहे. काँग्रेसतर्फे पृथ्वीराज चव्हाण यांना प्रोजेक्ट करणारी एक जाहिरात सध्या सर्वत्र प्रसिद्ध होत आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारकिर्दीचा आढावा सांगणा-या या जाहिरातीतील एका दृश्यात पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री म्हणून स्वाक्षरी करताना दाखविण्यात आले आहेत. परंतु, राज्यात राष्ट्रपती राजवट सुरू असताना आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदावरून राजीनामा दिलेला असताना काँग्रेसतर्फे चालविल्या जाणाऱया मुख्यमंत्र्यांची जाहिरात दिशाभूल करणारी असल्याचे रवींद्र वायकर यांचे म्हणणे आहे. या जाहिरातीबाबत निवडणूक आयोगाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी वायकर यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

Leave a Comment