धोरणात्मक संबंधांना चालना देणारी चर्चा – नरेंद्र मोदी

modi
वॉशिंग्टन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाच दिवसांच्या अमेरिका दौ-याची सांगता झाली असून, अमेरिकेचा दौरा धोरणात्मक संबंधांना चालना देणारी चर्चा झाल्याचे मोदींनी निघताना सांगितले. अमेरिका दौ-यातील शेवटचा अमेरिकी भारतीय उद्योग परिषदेचा नियोजित कार्यक्रम आटोपल्यानंतर मोदी भारतात येण्य़ासाठी निघाले आहेत.

नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यामध्ये मंगळवारी व्हाईट हाऊसच्या ओव्हल कार्यालयात शिष्टमंडळ स्तरावर व्दिपक्षीय चर्चा झाली. या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त निवेदन प्रसिध्द करुन, त्यात भारत-अमेरिका संबंध नव्या उंचीवर नेणार असल्याचे म्हटले आहे.

भारत आणि अमेरिका परस्परांचे नैसर्गिक सहकारी असल्याचे मत मोदींनी व्यक्त केले. बैठकीत संरक्षण, व्यापर, आर्थिक सहकार्य, दहशतवाद आणि नागरी अणूऊर्जा करार या मुद्यावर चर्चा झाली. नागरी अणूऊर्जा करारातील मतभेदाच्या मुद्यातून मार्ग काढण्याचे दोन्ही देशांनी ठरवले आहे. मोदींनी आपल्या निवेदनात जागतिक व्यापार संघटनेच्या कराराचाही उल्लेख केला.

भारताचा अन्नसुरक्षेचा मुद्दा आम्ही अमेरिकेच्या ध्यानात आणून दिला असून, डब्लूटीओमध्ये चर्चा करताना भारताचा अन्न सुरक्षेसंबंधी मुद्या समजून घ्यावा अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली.

संयुक्त पत्रकारपरिषदेमध्ये ओबामांनीही मोदींचे कौतुक केले. भारतातील गरीबी निर्मुलनाचीच नव्हे तर त्याच बरोबर अर्थव्यवस्था सुधारण्याची मोदींची जी इच्छा आहे त्याने आपल्याला आकर्षित केल्याचे ओबामांनी सांगितले.

दहशतवादा विरुध्द दोन्ही देश परस्पर सहकार्य वाढवणार असले तरी, भारताने इसिस विरुध्दच्या आंतरराष्ट्रीय मोहिमेत सहभागी होण्याची अमेरिकेची विनंती मान्य केली नाही. नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा यशस्वी ठरल्याने, भविष्यात भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ होतील. बुधवारी रात्री नरेंद्र मोदी भारतात दाखल होतील.

Leave a Comment