आघाडीतील बिघाडीला थोरले पवार जबाबदार : चव्हाण

cm
तुळजापूर: राज्यातील १५ वर्षापासूनची काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती तुटण्यास राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची राक्षसी महत्वाकांक्षा कारणीभूत असल्याची कठोर टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. राष्ट्रवादीची भारतीय जनता पक्षाबरोबर छुपी
युती असून त्यांनी ठरवून राज्यात राष्ट्रपती राजवट आणल्याचा आरोपही त्यांनी केला.

येथील तुळजाभवानीचे दर्शन घेऊन चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फोडला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी थेट शरद पवार यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या.

पवार यांच्या पक्षाचा जन्मच त्यांच्या राक्षसी राजकीय महत्त्वाकांक्षेतून झाला आहे. देशाच्या पंतप्रधानपदी आरूढ होण्याच्या महत्वाकांक्षेपोटी
त्यांनी सन १९९९ मध्ये काँग्रेसमधून काडीमोड घेऊन स्वतंत्र पक्ष स्थापन केला. आता राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्यातील सत्ता आपल्याच हाती रहावी; यासाठी पवार पुन्हा तसाच खेळ खेळत आहेत; अशी टीका चव्हाण यांनी केली. आपल्या राजकीय स्वार्थासाठी पवार यांनी भाजपशी छुपी युती केली आहे. त्यांच्याशी हातमिळवणी करूनच त्यांनी ऐनवेळी आघाडी मोडली. सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. अशाप्रकारे आघाडीत बिघाडी होण्यास आणि राज्यात राष्ट्रपती राजवट येण्यास पवारच कारणीभूत आहेत; असा
आरोपही चव्हाण यांनी केला.

Leave a Comment