
मुंबई : महायुतीतील घटक पक्ष शिवसेना-भाजपा युतीत काडीमोड झाल्यानंतर भाजपासोबत गेले. भाजपासोबत जाण्याचा निर्णय ‘रिपाइ’चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी सुध्दा घेतला. मात्र, शिवशक्ती-भिमशक्तीचा भगवा आणि निळा झेंडा विधानसभेवर फडकविण्यासाठी अर्जुन डांगळे यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला असून त्यांच्या रूपाने शिवसेनेच्या मदतीला अर्जुन धावून आला, अशी भावना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
शिवसेनेच्या मदतीला अर्जुन – उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे ‘मातोश्री’वर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी रिपाइंचे बंडखोर नेते अर्जुन डांगळे व त्यांचे सहकारी उपस्थित होते. डांगळे यांनी शिवेसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी शिवसेनेवर दाखविलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. त्यांच्यावर पश्चातापाची वेळ येऊ देणार नाही, अशी ग्वाही ठाकरे यांनी या वेळी दिली.
