ओबामांच्या गुजराथी स्वागताला मोदींचे इंग्लीशमध्ये उत्तर

modi2
वॉशिंग्टन- आपले न्यूयॉर्कमधील कार्यक्रम आटोपून काल रात्री वॉशिंग्टनला पोहोचलेल्या नरेंद्र मोदींचे व्हाईट हाऊसच्या दारात येऊन अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी स्वागत केले. ओबामांनी यावेळी गुजराथीत पंतप्रधान मोदींना केम छो मिस्टर प्राईमनिमिस्टर असे विचारताच मोदींनी आय अॅम फाईन असे इंग्रजीत उत्तर दिले. मोदींच्या स्वागतासाठी व्हाईटहाऊस बाहेरही मोठ्या संख्येने लोक जमले होते आणि तेथे गरबा, भांगडा हे नृत्यप्रकार केले जात होते.

विदेश मंत्रालय प्रवक्ते अकबरूद्दीन यांनी दिलेल्या माहितीनुसार व्हाईट हाऊस मध्ये काल मोदींसाठी ओबामांनी खासगी डिनर आयोजित केले होते मात्र या डिनरला फर्स्ट लेडी मिशेल अनुपस्थित होत्या. डिनरमध्ये मोदींनी नवरात्रीचे उपवास असल्याने केवळ गरम पाणी घेतले मात्र त्याचवेळी अध्यक्ष ओबामांना तुमचे नेहमीप्रमाणे व्यवस्थित होऊद्या असेही सांगितले. डिनरला उपाध्यक्ष बिडेन, परराष्ट्र सचिव जॉन केरी, सुरक्षा सल्लागार सुसान राईस यांच्यासह अन्य २० प्रतिष्ठीत लोक होते तर मोदींच्या बरोबर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल, परराष्ट्र सचिव सुजाता सिंग, राजदूत एस. जयशंकर हे उपस्थित होते. मोदींनी यावेळी ओबामांना गीता भेट दिली तसेच अमेरिकेचे नेते मार्टिन ल्यूथर किंग १९५९ साली भारत भेटीवर आले होते त्यावेळी त्यांनी केलेल्या भाषणाची प्रतही दिली.

भारतीयांसाठी शाकाहारी मेनू होता. मोदी आणि ओबामा यांची ही भेट दीड तास चालली मात्र त्यात महत्त्वाच्या कोणत्याच मुद्यावर चर्चा झाली नाही. सुरक्षा, दहशतवाद, आयएसचा धोका, व्यापार या मुद्दयांवर आजच्या भेटीत चर्चा केली जाणार असल्याचेही समजते.

Leave a Comment