युती मोडण्याचा परिणाम जाणवणार

yuti
शिवसेनेने १९९० च्या दशकात मुंबई-पुण्याच्या बाहेर जिथे पहिल्यांदा आपला प्रभाव दाखवला ते ठिकाण म्हणजे औरंगाबाद. औरंगाबादची महानगरपालिका जिंकून शिवसेनेने मराठवाड्यात आपले पाय रोवले. शिवसेनेच्या तिथल्या वाढीला औरंगाबाद शहरातील जातीय दंगलीची तर पार्श्‍वभूमी होतीच, परंतु मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरामुळे नाराज झालेला सवर्ण वर्ग शिवसेनेच्या पाठीशी उभा राहिलेला होता. या पार्श्‍वभूमीवर सातत्याने निवडणुका होत गेल्या, भारतीय जनता पार्टीची साथ मिळत गेली आणि बघता बघता मराठवाडा हा भाजपा-सेनेचा विशेषत: शिवसेनेचा बालेकिल्ला होऊन गेला.

मराठवाड्यात साधारणत: शिवसेनेचा जोर भाजपापेक्षा जास्त आहे. परंतु एकटी शिवसेना किती खोल पाण्यात आहे आणि युतीविना भाजपा तरी आपली किती शक्ती दाखवू शकतो याची परीक्षा आता होणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेनेचा कस लागणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यात नऊ मतदारसंघ आहेत आणि त्यातील दोन मतदारसंघ शिवसेनेकडे, तीन कॉंग्रेसकडे, दोन अपक्षांकडे तर प्रत्येकी एक मतदारसंघ मनसे आणि राष्ट्रवादी यांच्याकडे आहे. गेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला एकही जागा मिळाली नव्हती. यावेळी मात्र आपली शक्ती दाखविण्याचा त्यांनी निर्धार केलेला आहे.

औरंगाबाद शहराशी निगडित असलेल्या तीन मतदार संघांमध्ये मुस्लीम मतांचा प्रभाव आहे. ती मते संघटित करण्यासाठी एमआयएम या पक्षाने निवडणुकीच्या मैदानात उडी मारली आहे. त्याचा परिणाम औरंगाबादच्या तीन मतदारसंघात तसेच पैठणमध्ये जाणवेल आणि त्याचा फायदा त्या त्या मतदारसंघात समर्थ असलेल्या भाजपा किंवा शिवसेनेच्या उमेदवाराला मिळेल. यापैकी कोणालाही फायदा मिळाला तरी एमआयएमचा परिणाम कॉंग्रेसवर होणार आहे. विशेषत: शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांच्या औरंगाबाद पूर्व मतदारसंघात त्यांना फटका बसू शकतो. भारतीय जनता पार्टीचे अतुल सावे आणि शिवसेनेच्या कला ओझा हे दोघेही हिंदुत्ववादी उमेदवार मैदानात आहेत. भाकपाचे भालचंद्र कानगो यांनीही मैदानात उडी घेतली आहे, परंतु त्यांचा मतदारांवर फारसा प्रभाव नाही. राजेंद्र दर्डा यांच्या उमेदवारीला त्यांच्या पक्षातले नाराज नेते उत्तमसिंह पवार यांनीही आव्हान दिले आहे. या मतदारसंघात कोण निवडून येईल हे सांगता येत नाही, परंतु राजेंद्र दर्डा पडणार हे मात्र नक्कीच सांगता येते.

औरंगाबाद पश्‍चिम हा मतदारसंघ आरक्षित आहे आणि तिथेही एमआयएमचा उमेदवार म्हणून रिपब्लिकन नेते माजी मंत्री गंगाधर गाडे हे उभे आहेत. कॉंग्रेसच्या मतांत भगदाड पाडण्यास एमआयएमचा उमेदवार कारणीभूत ठरेल आणि सध्या शिवसेनेच्या हातात असलेला हा मतदारसंघ शिवसेनेकडे राहील, संजय शिरसाट हे पुन्हा निवडून येतील. कारण या मतदारसंघातला भाजपाचा उमेदवार म्हणावा तेवढा प्रभावशाली नाही. औरंगाबाद मध्य मतदारसंघात सुद्धा एमआयएमचे उमेदवार म्हणून इम्तियाज जलील उभे आहेत आणि कॉंग्रेसने माजी आमदार एम.एम. शेख यांना उभे केले आहे. प्रभावशाली असलेल्या मुस्लीम मतांत फूट पडणार आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे बंडखोर नेते प्रदीप जैस्वाल हे निवडून आलेले आहेत आणि ते आता शिवसेनेत आलेले आहेत. त्यामुळे नाराज झालेल्या किशनचंद तनवाणी यांनी शिवसेनेचा त्याग करून भाजपात प्रवेश केला आहे आणि भाजपाने त्यांना उभे केले आहे. या मतदारसंघात प्रदीप जैस्वाल वरचढ ठरण्याची शक्यता आहे.

फुलंब्री मतदारसंघात सध्या कॉंग्रेसचे आमदार कल्याण काळे पुन्हा उभे आहेत. भाजपाचे हरिभाऊ बागडे हे त्यांना जेरीस आणतील असे बोलले जाते. या मतदारसंघात शिवसेना, राष्ट्रवादी यांचे उमेदवार उभे असले तरी ते अतीशय निष्प्रभ आहेत. खरा सामना हरिभाऊ बागडे आणि कल्याण काळे यांच्यात होणार आहे. २००९ च्या निवडणुकीत हरिभाऊ बागडे हे निसटत्या मतांनी पराभूत झाले होते. यावेळी मोदी लाटेच्या जोरावर ते बाजी मारतील असे भाजपाचे नेते दावा करत आहेत. सिल्लोड हा एक कॉंग्रेसकडे असलेला मतदारसंघ. तिथे अब्दुल सत्तार हे आमदार आहेत. भाजपाचे सुरेश बनकर आणि शिवसेनेचे सुनील मिरकर यांच्यामध्ये कॉंग्रेसविरोधी मतांची विभागणी झाली तर अब्दुल सत्तार पुन्हा निवडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अब्दुल सत्तार हे नेहमीच दलित आणि मुस्लीम यांच्या मतांवर निवडून आलेले आहेत, पण यावेळी त्यांना ते शक्य होईल की नाही शंका आहे.

या जिल्ह्यातील लक्षवेधी ठरणारा मतदारसंघ म्हणजे कन्नड. कन्नडमधून २००९ साली हर्षवर्धन जाधव हे मनसेचे उमेदवार म्हणून निवडून आले. पण पुढे त्यांचे राज ठाकरे यांच्याशी बिनसले. आता ते शिवसेनेत गेले आहेत. त्यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे त्यांचे सासरे आहेत. शिवसेनेची उमेदवारी आणि सासर्‍यांकडून मिळणारी भाजपाची मदत याच्या जोरावर हर्षवर्धन जाधव पुन्हा बाजी मारतील अशी शक्यता आहे. या मतदारसंघात मराठा, वंजारा आणि आदिवासी या समाजाचे प्राबल्य आहे. मराठा समाज आणि नव मतदार हर्षवर्धन जाधव यांच्या उपयोगी पडेल असे वाटते.

शिवसेना आणि भाजपाच्या जागा वाटपात कळीचा ठरलेला वादग्रस्त मतदारसंघ म्हणजे गंगापूर. या मतदारसंघात प्रशांत बंब हे आमदार आहेत. ते २००९ साली अपक्ष म्हणून निवडून आले होते, पण आता भाजपात आले आहेत. बंब यांनी २००९ साली शिवसेनेचा पराभव केला होता, मात्र तो मतदारसंघ शिवसेनेचा म्हणून शिवसेनेला सोडावा अशी शिवसेनेची मागणी होती. भाजपाला ती मान्य नव्हती. प्रकाश बंब हे विद्यमान आमदार भाजपाचे असल्यामुळे ही जागा भाजपाला सोडावी असे त्यांचे म्हणणे होते. शेवटी युती तुटली, त्यामुळे आता या मतदारसंघात भाजपाचे प्रकाश बंब, शिवसेनेचे अंबादास दानवे, कॉंग्रेसच्या शोभा खोचरे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. प्रकाश बंब बाजी मारतील असे वाटते.

या जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असलेली एकुलती एक जागा म्हणजे पैठण. या मतदारसंघात संजय वाघचौरे हे निवडून आले आहेत. यावेळी सुद्धा शिवसेना, भाजपा आणि कॉंग्रेस या तिन्ही पक्षांना वाघचौरे यांच्या विरोधात फार मोठे आव्हान उभे करता आलेले नाही. त्यामुळे वाघचौरे यांना चांगली संधी आहे, मात्र भाजपाने प्रचारात आघाडी मारली आणि औरंगाबादेत नरेंद्र मोदी यांची सभा झाली तर मात्र संजय वाघचौरे यांच्यासमोर आव्हान उभे राहणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातला शिवसेनेकडे असलेला एक मतदारसंघ म्हणजे वैजापूर. त्यांच्या विरोधात गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे भाऊसाहेब पाटील चिकटगावकर हे उभे होते आणि त्यांनी शिवसेनेचे आमदार आर. एम. वाणी यांना चांगलीच लढत दिली होती. ही लढत पुन्हा एकदा रंगणार आहे.

Leave a Comment