आज राज ठाकरे यांची पहिली जाहीर सभा

raj
मुंबई : राजकीय वातावरण विधानसभा निवडणुकीसाठी चांगलेच तापले असून त्यातच राज्यातील आघाडी आणि युतीने घेतलेला काडीमोड पाहता प्रत्येक पक्षासाठी ही निवडणूक महत्वाची असणार आहे. मनसेने देखील आपल्या तब्बल 239 उमेदवारांची घोषणा या निवडणुकीसाठी केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे निवडणूक प्रचाराचा शुभारंभ आज सायंकाळी ५ वाजता ठाकुर कॉम्प्लेक्स कांदिवली येथे जाहीर सभा घेऊन करणार आहेत.

मनसेच्या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ब्लू प्रिंटचे नुकतेच प्रकाशन राज यांनी केले. मात्र, राज यांनी यावेळी राजकीय बोलणे टाळले. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येण्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात असल्याने याबाबत आज राज ठाकरे भाष्य करणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव पाहता राज यांनी आगामी विधानसभा निवडणुकीवर संपूर्ण लक्ष केंद्रीत केले असून, राज यांच्या आज होणाऱया सभेत ते कोणाचा समाचार घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी राज यांच्या मनसेकडे उमेदवार नसल्याच्या बातम्या येत असताना राज यांनी मनसेच्या 239 उमेदवारांची घोषणा करून विरोधी पक्षांवर चांगलीच कुरघोडी केली आहे. त्यामुळे या मुद्यावरही राज आज बोलण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत शिवडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवाराला मनसेच्या उमेदवारापेक्षा मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे मनसे नेते बाळा नांदगांवकर हे निवडणूक लढविण्यास इच्छुक नसल्याची चर्चा होती. मात्र, मनसेच्या तिसऱया यादीत बाळा नांदगांवकर यांचे नाव जाहीर करण्यात आले असून, आपण राज ठाकरे यांच्या प्रेमापोटी निवडणूक लढवित असल्याचे नांदगांवकर यांनी सांगितले.

Leave a Comment