वीज पुरवठा रिस्टोअर करणारे रोबो

robo
वादळ, पूर, भूकंप यासारख्या आपत्तीत वीजपुरवठा हमखास विस्कळीत होतो आणि संकटातील लोकांसाठीच्या मदतकार्यात अडथळे येतात. ही अडचण दूर करण्यासाठी मिशिगन विद्यापीठातील संशोधकांनी वीजपुरवठा सुरळीत करतील शिवाय मदत कार्यात मदत करू शकतील असे रोबो बनविले आहेत. या रोबो टीमचे टेबल टॉप मॉडेल नुकतेच सादर केले गेले आहे.

संशोधक नीना ममोडियन आणि त्यांच्या पथकाने हे रोबो तयार केले आहेत. संशोधकांच्या म्हणण्यानुसार आपत्तीकाळात वीजपुरवठा बंद पडला असताना कम्युनिकेशन टॉवरमधील वीज पुन्हा सुरू करता आली तर आपण आपत्तीत सापडलेल्या नागरिकांना सुलभरित्या शोधू शकतो. मदतीसाठी आलेल्या पथकांनाही एकमेकांशी संवाद साधता येतो. हे नजरेसमोर ठेवून आम्ही रोबो तयार केले आहेत. छोटी इलेक्ट्रीकल नेटवर्क हे रोबो त्वरीत सुरू करू शकतात. तारा जोडणे, बॅटर्‍या जोडणे यासारखी कामे करून हे रोबो तेथील दिवे सुरू करू शकतात अथवा झेंडा फडकावून वीज पुरवठा सुरू केल्याची सूचना देऊ शकतात.

रोबोंचे हे पथक असले तरी प्रत्येक रोबो स्वतंत्रपणे काम करू शकतो. अडचणीच्या भागात सर्वात जवळचा मार्ग शोधणे, वाटेतील अडथळे जाणून त्याप्रमाणे रस्ता शोधणे अशी कामे करतानाच ते बॅटर्‍या, जनरेटरही बरोबर कॅरी करू शकतात. अडचणीच्या काळात जेव्हा लष्कराची मदत घेतली जाते तेव्हा हे रोबो लष्कर मदतीला येण्यापूर्वी मदत सामग्री तेथे वाहून नेऊ शकतात व यामुळे मदतकार्य त्वरीत सुरू करता येते.

Leave a Comment