ठाण्यात अनंत तरेंची बंडखोरी

anant-tare
मुंबई : शिवसेनेचे ठाणे जिल्हा संपर्कनेते एकनाथ शिंदे यांच्या विरोधात शिवसेनेचे उपनेते अनंत तरे यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्यामुळे शिवसेनेला ठाण्यात मोठा धक्का बसला आहे.

अनंत तरे यांनी कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणाला आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे हे कोपरी पाचपाखाडी मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. या भागात त्यांची ताकद असून, शिंदे हे शिवसेनेचे ठाण्यातील प्रमुख नेते आहेत. तरे यांनी बंडखोरी करून त्यांच्या समोर आव्हान उभे केले आहे. आता शिवसेना नेतृत्व तरे यांची समजूत काढण्यात यशस्वी होणार का ? याकडे ठाणे जिल्हयाचे लक्ष लागले आहे.