मुखपत्रातुन भाजपवर शिवसेनेची टीकेची झोड

uddhav
मुंबई – काल राज्यात २५ वर्ष जुनी भाजप सेनेची युती अखेर तुटली असून या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या सामना या मुखपत्रातुन भाजपवर टीकेची झोड उडवली आहे.

उद्धव ठाकरेंनी युती तुटली हे दुर्दैवच असले तरी आम्ही युती टिकवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले असल्याचे स्पष्ट केले.

महाराष्ट्राच्या आयुष्यातील अमावस्या संपली असून पितृपक्षाचे कावळे उडाले असून, आता शूर मावळेच राहिले आहेत. अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

राजकारणामुळे महाराष्ट्राच्या भवितव्याचे गणित बिघडल्यास इतिहास माफ करणार नाही. सध्या प्रत्येक पक्षात ‘सेनापती’ तयार झाले आहेत. काल जे या तंबूत आरती करत होते ते दुस-याच क्षणी दुस-या तंबूत जाऊन नमाज पढतात.

विचार, निष्ठा या शब्दांना काही मोलच उरलेले नाही असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. शिवसेना – भाजप युती राहावी अशी भावना मित्रपक्षांसह महाराष्ट्रातील ११ कोटी जनतेचीही होती. या भावनेचा चोळामोळा करणारे महाराष्ट्राचे शत्रूच आहेत असे खडेबोलही त्यांनी भाजपला सुनावले आहेत.