
मुंबई : शुक्रवारी सायंकाळी राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपला राजीनामा सोपविल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असल्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पृथ्वीबाबांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
गुरुवारी रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडीत बिघाडी झाल्यानंतर आपला पाठिंबा काढून घेतला. त्यानंतर अल्पमतात आलेल्या काँग्रेसला सत्तेवरुन काढण्यात येऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी विरोधकांनी केली होती. विधानसभा विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी यासाठी राज्यपालानांची भेट घेऊन ही मागणी केली होती. त्यानंतर आज मुख्यमंत्री चव्हाण यांनी राज्यपाल आणि वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
राज्यात राष्ट्रपती राजवट पुलोद सरकारच्या काळात लागू करण्यात आली होती. आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास ही दुसरी वेळ असेल. विधानसभा निवडणूक महिन्याभरावर येऊन ठेपल्याने राज्याच्या कारभारावर तितकासा परिणाम पडणार नाही, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.
