चीनचेही मेड इन चायना अभियान

china
बिजिग- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच मेक इन इंडिया अभियानाचे उद्घाटन भारताबरोबर कांही अन्य देशातही केले असताना चीनने प्रत्युत्तरादाखल कालच मेड इन चायना अभियान सुरू होत असल्याची घोषणा केली आहे. चीन सरकारने त्यासंदर्भातली घोषणा करताना करसवलतींची आतषबाजीही केली आहे.

चीन सरकारने मेड इन चायना अभियानाची सुरवात झाली असल्याचे घोषित करताना हायटेक तंत्रज्ञान आयात, संशोधन विकास यासाठी उद्योगांना प्रोत्साहन मिळावे म्हणून करसवलती जाहीर केल्या आहेत. जगातील प्रचंड मोठे उत्पादन केंद्र म्हणून चीनचा लौकिक आहे. चीनी अर्थव्यवस्थेला चांगली गती देण्यासही हा लौकीक उपयुक्त ठरला आहे. आता भारताने सुरू केलेल्या अभियानाचा विपरित परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून चीनने हे अभियान हाती घेतले असून त्याद्वारे जे उद्योग अपग्रेड होतील, संशोधनविकास क्षेत्रात वाढ करतील आणि उत्पादन उद्योगांत सुधारणा दाखवितील त्यांना जानेवारी पासून करसवलती दिल्या जाणार आहेत. हायटेक उपकरणे आयातीसाठीही या करसवलती लागू होणार आहेत.

प्रामुख्याने एव्हिएशन, बायो मेडिकल उत्पादने, रेल्वे उत्पादने, जहाज बांधणी, इलेक्ट्रोनिक उत्पादने, संगणक, टेलिकम्युनिकेशनसाठी आवश्यक उपकरणे आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी उपयुक्त उत्पादने यांना करसवलती दिल्या जाणार आहेत.

Leave a Comment