भारतात आयफोन सिक्स काळ्या बाजारात उपलब्ध

iphon
मुंबई – अॅपलने नुकत्याच दहाहून अधिक देशांत एकाचवेळी विक्री सुरू केलेल्या आयफोन सिक्स आणि आयफोन प्लससाठी ग्राहकांच्या कशा उड्या पडत आहेत याची वर्णने येत असतानाच भारतात काळ्या बाजारात हे दोन्ही फोन १ ते २ लाख रूपयांमध्ये सहजी उपलब्ध होत असल्याचे वृत्त आहे. भारतात आयफोन कधी येणार याची कोणतीही तारीख कंपनीने जाहीर केलेली नाही. सुरवातीला २५ सप्टेंबर व नंतर १७ अक्टोबर अशा दोन तारखा कंपनीच्या वेबसाईटवर भारत प्रवेशासाठी जाहीर केल्या गेल्या होत्या मात्र आता त्या वेबसाईटवरून काढून टाकण्यात आल्या आहेत.

भारत ही आयफोन सिक्ससाठी बाजारपेठ म्हणून अॅपलने कधीच ठरविली नव्हती मात्र येथेही हे दोन्ही फोन विकले जात आहेत आणि काळ्या बाजारातून ग्राहक खरेदीही करत आहेत. अॅपल स्टोअर्स चालकांच्या मते हे दोन्ही फोन दिवाळीच्या सुमारास भारतात येतील आणि ते साधारण ५५ ते ६० हजार रूपयांच्या दरम्यान असतील. काळ्या बाजारात सध्या एकाच रंगात हे फोन मिळत आहेत मात्र येथील विक्रेत्यानी कोणत्याही रंगातील फोन कांही मिनिटात उपलब्ध करून देण्याची तयारी दाखविली आहे. आयफोन सिक्स ६४ जीबीसाठी १ लाख ते १लाख १० हजार रूपयांत तर प्लस १२८ जीबीसाठी १लाख ८० हजार ते २ लाख रूपयांत विकले जात आहेत. कांही ठिकाणी त्यावर ५ हजार रूपये डिस्काऊंटही दिला जात आहे.

सध्या हे दोन्ही फोन यूएस, ऑस्ट्रेलिया, कॅनडा,फ्रान्स, जर्मनी, हाँगकाँग, सिंगापूर आणि युके मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत

Leave a Comment