मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे मोदी सरकारचे मनसुबे – राणे

narayan-rane
मुंबई – मुंबईवर गुजराती लोकांचे महाराष्ट्राच्या स्थापनेपासूनच लक्ष आहे. महाराष्ट्र व गुजरात राज्याची निर्मिती होत असतानाही मुंबई गुजरातला जोडण्याचा प्रयत्न मोरारजी देसाई यांनी केला होता. पण १०५ हुतात्म्यांनी प्राणाची आहुती दिली आणि मुंबई वाचली. आता पुन्हा एकदा मुंबई गुजरातला जोडण्याचा नाहीतर केंद्रशासित प्रदेश करण्याचा डाव मोदी सरकारने घातला असल्याचा घाणाघाती आरोप उद्योगमंत्री नारायण राणेंनी केला.

मुंबईत पत्रकार परिषदेत नारायण राणे बोलत होते. राणे म्हणाले, काही लोकांना मुंबई महाराष्ट्रात आहे व तिची भरभराट होत आहे हे सहन होत नाही. मग अशा स्थितीत मुंबईचे महत्त्व कसे कमी होईल यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मुंबईला केंद्रशासित करण्याचाही काही लोकांचा डाव आहे. मात्र तो आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही.

केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल करताना राणे म्हणाले, १९६० च्या दशकात मोरारजी देसाईंनी मुंबईला गुजरातमध्ये जोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी १०५ हुतात्मे देऊन महाराष्ट्राने मुंबई मिळवली. मराठी माणसांची मुंबईवर मजबूत पकड असल्याचे पाहून काही लोकांनी आता मुंबईचे महत्त्व कमी कसे होईल यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. नरेंद्र मोदींनी नव्या मुंबईतील जेएनपीटी पोर्ट टस्टमधील सागरी मार्गाने होणा-या वाहतूक व व्यापार गुजरातमधील बंदरांकडे वळवायचा प्रयत्न चालवलेला आहे. मुंबईप्रमाणेच रिझर्व्ह बँकेची शाखाही अहमदाबादेत सुरू करायची आहे. मात्र, मराठी अस्मिताचे राजकारण करणा-या शिवसेनेला व उद्धव ठाकरेंना हे कसे काय चालते, अशी टीका राणेंनी केली.

Leave a Comment