‘मंगळ’ मंगल मंगल हो!

mars
बंगळुरु – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने अंतराळ मोहीमेच्या इतिहासात बुधवारी सुवर्ण अध्यायाची नोंद केली असून भारताने पहिल्याच प्रयत्नात मंगळ मोहीम यशस्वी करण्याची किमया साधली आहे.

मंगळयानाने मंगळाच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत सकाळी आठच्या सुमारास प्रवेश केला व पहिल्याच प्रयत्नात मंगळ मोहीम यशस्वी करणारे भारत हे जगातील पहिले राष्ट्र ठरल्यामुळे इस्त्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

इस्त्रोने मंगळावर संशोधन करण्यासाठी मार्स ऑर्बिटर मिशन ही महत्त्वपूर्ण मोहीम हाती घेतली होती. या मोहीमेअंतर्गत ५ नोव्हेंबर २०१३ रोजी आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा येथील पीएसएलव्ही सी -२५ च्या मदतीने मंगळयान प्रक्षेपित करण्यात आले होते.

३०० दिवसांमध्ये सुमारे ६६६ दशलक्ष किलोमीटरचे अंतर कापून मंगळयानाने बुधवारी यशस्वीपणे मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला. बुधवारी सकाळी पावणे सातपासून मंगळयानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली.

मंगळयानाला रेटा देण्यासाठी ‘लिक्विड अॅीपोजी मोटार इंजिन सुरु करण्यात आले. सुमारे २४ मिनीटे हे इंजिन सुरु होते. सर्व टप्पे सुरळीत पार केल्यानंतर ८ वाजण्याच्या सुमारास मंगळयानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला.

भारताची महत्त्वाकांक्षी मंगळ मोहीम निर्विघ्न पार पडल्याचे इस्त्रोतर्फे जाहीर करण्यात आले. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही इस्त्रोच्या कंट्रोल रुममध्ये उपस्थित होते.

मोहीम फत्ते झाल्याचे स्पष्ट होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे कौतुक केले. आजचा क्षण ऐतिहासिक असून इस्त्रोतील शास्त्रज्ञांच्या अथक मेहनतीमुळेच हे शक्य झाले आहे असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काढले.

इस्त्रोतील शास्त्रज्ञांना अशक्य ते शक्य करुन दाखवण्याची सवय लागली असून या शास्त्रज्ञांनी प्रगत देशांनाही मागे टाकून मंगळावर झेप घेतल्याचा अभिमान वाटतो अशा शब्दात मोदींनी शास्त्रज्ञांचे कौतुक केले.

पहिल्याच प्रयत्नात मंगळ मोहीम यशस्वी करणारा भारत हा पहिलाच देश बनला असून, मंगळ मोहीम पूर्ण करणा-या अमेरिका, रशिया, युरोपीय महासंघ या देशांच्या रांगेत आता भारताचाही नंबर लागला आहे.

१९९९ व २००१ मध्ये जपान व चीननेही मंगळ मोहीमेसाठी प्रयत्न केले होते. मात्र यात त्यांना अपयश आले होते.

मंगळयानाची वैशिष्ट्ये
– मंगळयानाचे वजन १३५० किलोग्रॅम ऐवढे आहे.
– मंगळ मोहीमेसाठी ४५० कोटी रुपये खर्च झाला असून अन्य देशांच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे.
– अंतराचा विचार केल्यास भारताला प्रति किलोमीटर ११ रुपये ऐवढाच खर्च आला आहे.
– इस्त्रोच्या दीड हजार अधिकारी व कर्मचा-यांनी या मोहीमेसाठी दिवसरात्र अथक मेहनत घेतली.
– या मोहीमेद्वारे भारताला मंगळ ग्रहाविषयी संशोधन करता येणार आहे
– मंगळ ग्रहाची छायाचित्रेही भारताला मिळणार आहेत.

Leave a Comment