नवरात्र- शक्ती उपासनेचा सोहळा

navratri
शारदीय नवरात्राला उद्यापासून सुरवात होत आहे. नवरात्राची सुरवात घटस्थापनेपासून केली जाते. घटस्थापना म्हणजे आपल्या घरात दुर्गारूपी शक्तीची कलश मांडून केलेली साधना. नऊ दिवसाचा हा सोहळा अतिशय श्रद्धेने देशभर साजरा केला जातो.

घटस्थापनेला जशी घराघरातून कलशाची स्थापना होते तशीच देशभरातील दुर्गा मंदिरातूनही घटस्थापना केली जाते. हा विधी सांग्रसंगीत साजरा केला जातो. सारवलेल्या जमिनीवर पवित्र मृत्तिका पसरून त्यावर जलाने भरलेला कलश स्थापन केला जातो. देवीची मूर्ती अथवा फोटो ठेवला जातो. सप्तधान्यांची पेरणी केली जाते. शाळीग्रामरूपी विष्णुची, गणेशाची, वरूण, मातृका, लोकपाल, नवग्रह पूजा करून स्वस्तीवाचन केले जाते आणि नंतर दुर्गेची षोडशोपचार पूजा संपन्न होते.

अनेक घरात या काळात सप्तशतीचा पाठ केला जातो. नऊ दिवस उपवास केले जातात. सकाळ सायंकाळ आरती केली जाते. तसेच नऊ दिवस अहोरात्र दीप तेवता ठेवला जातो. रोज नवी तीळ फुलांची माळ घटाला घातली जाते. ज्योत अखंड तेवती ठेवण्यामागे शक्तीवरील अखंड विश्वासच भाविक व्यक्त करत असतात. दिव्याच्या अथवा अग्नीच्या साक्षीने केलेल्या जपाचे फळ हजारपटीने अधिक मिळते असाही साधकांचा विश्वास आहे. तुपाचा दिवा कलशाच्या उजव्या बाजूस तर तेलाचा दिवा कलशाच्या डाव्या बाजूस ठेवण्याची प्रथा आहे.

आरती करतानाही कांही नियम आहेत. त्यानुसार चौदा वेळा आरती ओवाळावी. चारवेळा देवीच्या चरणांपाशी, दोन वेळा नाभीच्या जागी, १ वेळा मुखाभोवती आणि सातवेळी संपूर्ण शरीराभोवती अशी आरती ओवाळली जाते. तसेच आरतीसाठी पेटविलेल्या निरांजनाच्या ज्येातींची संख्याही विषम असावी. म्हणजे १,३,५,७ ज्योतींनी आरती करावी अशी प्रथा आहे.