शिक्षणाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करा – उपराष्ट्रपती

hadmid-ansari
मुंबई – शिक्षणाच्या माध्यमातून महिला आणि अल्पसंख्याक समुदायाचे सक्षमीकरण करण्यावर उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी यांनी भर दिला आहे. ते आज मुंबईतील सोफिया महिला महाविद्यालयात आयोजित केलेल्या संवादात्मक कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी शिक्षण, खेळ, प्रसारमाध्यमांची भूमिका आणि आंतरराष्ट्रीय संबंध यांसारख्या वेगवेगळ्या विषयांवर विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने चर्चा केली.

शिक्षणाच्या अधिकाराचा कायदा लागू करण्यात आल्यामुळे एक चांगली सुरुवात झाली असली तरी प्राथमिक शिक्षणाची स्थिती समाधानकारक नसल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण ही एक भागीदारीची प्रक्रिया असून मुलांना शाळेत पाठवण्याची जबाबदारी त्यांच्या पालकांची असते आणि त्यांना चांगले शिक्षण देण्याची जबाबदारी शाळांची असते, असे उपराष्ट्रपती म्हणाले. शिक्षणाच्या अधिकारामुळे बालकांना शाळेत दाखल करण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र या बालकांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करण्यामध्ये शिक्षण प्रणाली अपयशी ठरत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. हे चित्र सरकारच्या पुढाकाराने होणाऱ्या उपाययोजनांपेक्षा समाजाच्या पुढाकाराने बदलता येईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

शिक्षण क्षेत्रामध्ये वाढत असलेल्या ताणतणावाच्या पातळीबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. सर्वोत्तम बनण्यासाठी कष्टांची गरज असते. तणावाचे रुपांतर आनंदामध्ये करणे हे सर्वात मोठे आव्हान आहे, असे ते म्हणाले. शिक्षणाच्या अधिकारांतर्गत खेळांनासुद्धा शालेय अभ्यासक्रमाचा भाग बनवले पाहिजे. खेळ खेळण्याचा अधिकार हा सुध्दा शिक्षणाचा अधिकाराचा भाग असला पाहिजे. देशाला विविध प्रकारच्या खेळांमध्ये प्राविण्य मिळवायचे असेल तर गुणवत्तेचा शोध घेण्यासाठी हे करावेच लागेल असे अन्सारी यांनी सांगितले.

Leave a Comment