‘वर्षा’वरील बैठकीनंतरही ठोस निर्णय नाही

aaghdi
मुंबई – मुंबईत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वर्षा या निवासस्थानी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची जागावाटपासाठी अंतिम बैठक झाली. या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नसून आजच्या बैठकीत राष्ट्रवादीने १३४ जागांचा प्रस्ताव दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र, काँग्रेसने १२४ पेक्षा अधिक जागा द्यायच्या असतील तर दिल्लीतील नेत्यांशी बोलूनच निर्णय घेतला जाईल अशी आडमुठी भूमिका घेतल्यामुळे आज सायंकाळी पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. युतीचा निर्णय अद्याप झाला नसल्याने आघाडीची टोलवाटोलवी सुरूच आहे.

आघाडीतील जागावाटपाबाबत जो काही निर्णय होईल तो आज सायंकाळच्या बैठकीत अंतिम असेल असे बोलले जात आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आक्रमक भूमिका घेत राष्ट्रवादीने तडजोडीची तयारी असेल तरच चर्चेला यावे अन्यथा आपापला मार्ग निवडावा असा गर्भित इशारा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आजच्या बैठकीत व एकूनच जागावाटपाबाबत नमते घेईल असे बोलले जात आहे. राष्ट्रवादीला १३० जागा मिळू शकतात मात्र त्यापुढील जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत.