चांदी खरेदीची चांदी करण्याची ग्राहकांना संधी

silver
मुंबई -आंतरराष्ट्रीय बाजारात कोसळलेले सोन्याचे दर, औद्योगिक क्षेत्राकडून कमी झालेली चांदीची मागणी यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशांतही चांदीचे दर कोसळले असून दिवाळीच्या आसपास हे दर ३७ हजार रूपये प्रति किलोवर येतील असा अंदाज जाणकारानी व्यक्त केला आहे. गेल्या चार वर्षात प्रथमच चांदीचे दर प्रति किलो ३९ हजारांवर आले असून सणाच्या काळातही ते फारसे वाढण्याची शक्यता नाही. सध्या बाजारात सोने व चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंचे दर घसरत चालले आहेत व हाच ट्रेंड कांही काळ राहिल असेही जाणकार सांगतात.

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे दर औंसाला १७.३० डॉलर्सवर आले आहेत तर देशांत चांदी ३९ हजारांवर घसरली आहे. जून २०१० नंतर प्रथमच चांदीच्या दराने ही पातळी गाठली आहे. मध्यंतरी सोने दर घसरत होते मात्र चांदीचे दर कायम होते. आता ही परिस्थिती बदलली असून सोन्याबरोबरच चांदीही उतरते आहे.

एंजल कमोडिटीचे अनुज गुप्ता म्हणाले की सोने ही सुरक्षित गुंतवणूक मानली जात असली तरी दर घसरत चालल्याने गुंतवणूकदारांनी सोन्यातील गुंतवणूक कमी केली आहे. सोन्याच्या घसरत्या दरांचा परिणाम चांदीवर होत असून चांदीचे दरही उतरत आहेत. शिवाय चांदीची औद्योगिक मागणीही कमी झाली आहे. सणाच्या काळात ग्राहकांकडची मागणीही २५ ते ३० टक्के कमीच राहील असे संकेत आहेत यामुळे चांदीचे दर नजीकच्या काळात ३७ हजारांवर येतील असा अंदाज आहे.

जगभरात गेल्या चार वर्षात चांदीची औद्योगिक क्षेत्राकडची मागणी ६४३२ लाख औसांवरून ५८६६ लाख औसांवर आली आहे. जगात चांदीचा जो एकूण खप होतो त्यातील ५५ टक्के चांदी औद्योगिक क्षेत्राकडूनच घेतली जात असते असेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment