मोदी भेट यूएस इंडिया पार्टनरशीप डे म्हणून ओळखली जाणार

senate
वॉशिग्टन – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकावारीवर गेल्यानंतर ३० सप्टेंबरला व्हाईट हाऊसला भेट देणार आहेत. ही भेट यूएस इंडिया पार्टनरशीप डे म्हणून ओळखली जावी असा ठराव यूएस सिनेटने केला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे सह अध्यक्ष मार्क वॉर्नर आणि रिपब्लीकन पक्षाचे जॉन कोरन यांनी संयुक्तपणे हा प्रस्ताव सिनेटसमोर सादर केला आहे. त्याला सिनेटने एकमताने सहमती दर्शविली असल्याचे समजते.

एकविसाव्या शतकात भारत अमेरिका सहयोग हा स्थिरता, लोकशाहीला बळकटी आणि दोन्ही देशांच्या आर्थिक भरभराटीसाठी फार महत्त्वाचा आहे असे पत्रक वॉर्नर यांच्या कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यास आले आहे. १०० दिवसांतच मोदींच्या नेतृत्वाखाली दोन्ही देशांच्या संबंधांबाबत झालेल्या प्रगतीचा अभिमान वाटत असल्याचेही या पत्रकात नमूद केले गेले आहे. दोन्ही देशांना परस्परसंबंध अधिक दृढ करण्याची ही चांगली संधी असल्याचे तसेच उर्जा ते संरक्षण, दहशतवाद नियंत्रण ते व्यापार अशा अनेक बाबीत दोन्ही देशांचे प्रश्न आणि समस्या सारख्याच असल्याचेही या सिनेटरचे म्हणणे आहे.

व्यापार आणि उद्योग वाढीमुळे भारताकडे अमेरिकेची निर्यात वाढेल तसेच अमेरिकन नागरिकांना देशातच रोजगार निर्माण होईल अशी आशाही यात व्यक्त करण्यात आली आहे. जगातील दोन मोठ्या लोकशाहींची जगातील ही मोठी भागीदारी दोन्ही देशांच्या भरभराटीस सहाय्यभूत होणार असल्याचे आम्ही भारताच्या पंतप्रधानांचे मनापासून स्वागत करतो असेही या पत्रकात नमूद केले गेले आहे.

Leave a Comment