महत्वकांक्षी मंगळ मोहिमेला महत्वपूर्ण यश

mars
चेन्नई – भारताची महत्वकांक्षी असलेली मंगळ मोहिमेला आज महत्वपूर्ण यश मिळाले असून अवघ्या चार सेकंदात यानातील ४४० न्यूटॉन लिक्विड अ‍ॅपोजे मोटार इंजिन सुरू करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. हा टप्पा यशस्वी झाल्याने यानाचा मंगळाच्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश करण्याची शक्यता वाढली आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून बंद असलेले हे इंजिन सुरू करण्याचे शास्त्रज्ञांसमोर एक मोठे आव्हान होते.

तत्पूर्वी मंगळयान मंगळ ग्रहाच्या गुरुत्वकर्षणाचा प्रभाव असलेल्या कक्षेत आज सकाळी दाखल झाले. २४ सप्टेंबरला हे यान प्रत्यक्ष मंगळाच्या कक्षेत प्रवेश करणार आहे. मंगळयानाची महत्वाची चौथी मार्गक्रमण दुरुस्ती आज होती. मंगळाच्या गुरुत्वकर्षाणाचा प्रभाव असलेल्या ५.४ कि.मी.च्या क्षेत्रात मंगळयान दाखल झाल्याची माहिती इस्त्रोने सोशल नेटवर्कींग साईटवरुन दिली आहे.

मागच्यावर्षी पाच नोव्हेंबर रोजी श्रीहरीकोटा येथून मंगळयानाचा प्रवास सुरु झाला होता. एक डिसेंबर रोजी मंगळयान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडले. भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष मंगळयान मोहिमेकडे लागले आहे. कारण मंगळयानाने यशस्वीरित्या मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला तर, पहिल्याच प्रयत्नात अशी कामगिरी करणारा भारत हा जगातला एकमेव देश ठरणार आहे. कारण आतापर्यंत सर्वच अवकाश संशोधन संस्थांनी दोन-तीन प्रयत्नानंतर मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला आहे.

Leave a Comment