भाजप सेना नांदणार की घटस्फोट घेणार याचा फैसला आज

amit-shah
दिल्ली – महाराष्ट्रात गेली पंचवीस वर्षे कुरबुरत का होईना पण संसार करत असलेली भाजप सेना युती पुढेही नांदणार की घटस्फोट घेणार याचा फैसला आज म्हणजे सोमवारी लागणार आहे. महाराष्ट्राचे भाजप प्रभारी ओम माथूर आज उद्धव ठाकरे यांची भेट घेत असून त्यात हा निर्णय होईल असे सांगितले जात आहे.

दोन्ही पक्षात जागावाटपाचा तिढा कायम आहे आणि सेनेने ११९ जागा देण्याची दाखविलेली तयारी भाजपला मान्य नाही. परिणामी भाजपने १३० जागांसाठी आपले उमेदवार निश्चित केले असून आजच भाजप आपली पहिली यादी प्रसिद्ध करेल असेही सांगितले जात आहे. जागावाटपावर तोडगा काढण्यासाठी राज्यातील नेत्यांची दिल्लीत बैठक झाली. त्याला पंतप्रधान मोदी, अमित शहा, सुषमा स्वराज, नितीन गडकरी, जुआल ओराम, शहनवाझ हुसेन हजर होते. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी सेनेसमोर नमते घेऊ नये, स्वबळावर लढावे असा आग्रह धरला आहे त्याचा अंतिम निर्णय घेण्याची जबाबदारी मोदींनी अमित शहांवर सोपविली असल्याचेही खात्रीलायक वृत्त आहे.

इकडे सेनेनेही भाजपसमोर अजिबात झुकायचे नाही आणि आपला हेका कायम ठेवायचा असा निर्णय घेतला असल्याने उद्धव ठाकरे सातत्याने सेना नेत्यांबरोबर बैठका करत आहेत. बाकी घटक पक्षांनाही युतीचा काय निर्णय होतो याची प्रतीक्षा आहे व आज अंतिम निर्णय झाला नाही तर या पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर करण्याची तयारी चालविली असल्याचेही समजते.

Leave a Comment