दुर्गा साकारणाऱ्या कुशल हातांची कमाई घटली

durga
दुर्गापूजेसाठी सुंदर मूर्ती बनविण्याचे काम आता जवळजवळ संपुष्टात येत चालले असले तरी यंदा अनेक नियमांमुळे या मूर्ती बनविणार्‍या कारागिरांना कमी कमाई झाली असल्याचे सांगितले जात आहे. दोन दिवसांत देशभरात दुर्गा देवीचा उत्सव सुरू होत असून बंगाली दुर्गा पूजा उत्सव षष्ठी, सप्तमी आणि अष्टमीला फार मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. त्यासाठी भव्य मंडपात राक्षसाचे प्रदालण करणारी दुर्गेची मूर्ती स्थापन केली जाते.

या मूर्ती तयार करण्यात बंगाली कारागिर आघाडीवर असून या कारागिरांच्या मूर्तींना सर्वाधिक मागणी असते. अत्यंत कुशलतेने आणि नाजूक हातांनी हे कौशल्याचे काम करावे लागते. मात्र उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने अमलात आणलेल्या अनेक नियमांमुळे कारागिरांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे व मूर्ती बनवून मिळणारी कमाईही कमी झाली आहे.

प्रदूषण मंडळाच्या नियमानुसार मूर्तीसाठी नैसर्गिक रंगाचाच वापर करणे बंधनकारक केले आहे. मात्र हे रंग महाग आहेत, शिवाय ते चमकदार नसतात त्यामुळे मूर्तीला शोभा येत नाही असे कारागिरांचे म्हणणे आहे. तसेच देवीची साडी सुती कापडापासूनच बनविलेली असावी आणि दागिने सहज नष्ट करता येतील असेच हवेत असेही बंधन आहे. मूर्तीसाठी माती कोणती वापरायची याचीही नियमावली तयार केली गेली आहे. मूर्तीचे डोळे, ओठ, हाताची बोटे यासारखे काम करण्यासाठी कुशल कारागिर लागतात, त्यांची मजुरी वाढली आहे. मूर्तीचा लाकडी साचा असतो मात्र त्यातून मूर्ती अलग करतानाही फार काळजी घ्यावी लागते अशा वेळी कोणती माती वापरली यालाही महत्त्व असते असे कारागिरांचे म्हणणे आहे. देवीबरोबर राक्षसाचीही मूर्ती बनविली जात असते.

मूर्ती बनविण्याच्या उत्पादन खर्चात अनेक नियमांमुळे वाढ झाली आहे व त्यामुळे या व्यवसायातून पुरेशी कमाई होत नसल्याची खंत कारागीर व्यक्त करत आहेत.

Leave a Comment