हृद्रोग आता नव्या स्वरूपात

heart
हृदय विकाराची कारणे पूर्वीच्या काळात वय, लिंग, कौटुंबिक पार्श्‍वभूमी अशी आपल्या हातात नसलेली समजली जात होती. म्हणजेच आपल्या हातात नसलेले घटक हृदय विकाराला कारणीभूत आहेत हे त्या काळात उघड झालेले होते. पण आता मात्र आपण आपल्या हातून हा रोग जडवून घेत आहोत. जीवनशैली, आहार, शारीरिक हालचाली नसणे आणि तणाव या कारणामुळे हा विकार आता बळावत चालला आहे.

भारतामध्ये १२७ कोटी लोकसंख्यांपैकी ४ कोटी ५० लाख लोक हृदय विकाराने त्रस्त आहेत. थोड्याच दिवसांमध्ये भारताची ख्याती सर्वाधिक हृद्रोगी असलेला देश अशी निर्माण होईल. त्यातल्या त्यात तरुण पिढीला या रोगाने अधिक पीडलेले असेल. महिला आणि पुरुष या दोघांमध्येही हा विकार दिसून येईल आणि त्याचे सर्वात मोठे कारण आपली जीवनशैली हे असेल.

डॉ. निखीलकुमार हे गुडगांवमधील नामांकित हृदयरोग तज्ज्ञ आहेत. त्यांनी तरुणांमध्ये हृदयरोग बळावत चालल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. पाच वर्षांखाली आपल्याकडे आलेल्या हृद्रोग्यांमध्ये ३५ वर्षाच्या दरम्यानचे रोगी हे मोठ्या संख्येने असत. परंतु आता पंचविशीतली मुले सुद्धा हृदयरोगी होऊन आपल्याकडे तपासणीसाठी येत आहेत.

ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात हृदयरोग्यांचे प्रमाण जास्त आहे. शहरातील ७० टक्के लोकसंख्या हृद्रोगप्रवण आहे. शारीरिक हालचाली नसणे, टाईप टू डायबेटिस आणि लठ्ठपणा ही यामागची कारणे आहेत, असे डॉ. निखीलकुमार यांनी सांगितले. उच्च रक्तदाब हेही एक कारण असल्याचे त्यांचे मत आहे.