येथे स्वतःच केली जाते अंत्यविधी सामानाची खरेदी

tokyo
मृत्यू हा शब्द भल्याभल्याना घाम फोडणारा आहे. शूरवीरांची घाबरगुंडी उडविणारा हा शब्द स्वतःबाबत नुसता उच्चारण्याचेही माणसे टाळतात. मात्र जीवनाचे एकमेव सत्य मानून मृत्यू एन्जॉय करणारे लोकही जगात आहेत. जपानची राजधानी टोकियोत दरवर्षी असा मृत्यूचा सोहळा भरतो. या उत्सवाचे नांव आहे शुकात्सु. म्हणजे मृत्यूसाठी तयार होण्याचा सण. याचे विशेष म्हणजे आपण मेल्यानंतर कसे दिसावे, कुठल्या दफनपेटीत आपला देह ठेवला जावा, त्याची सजावट कशी करावी हे माणसे अगोदरच ठरवितात आणि अॅडव्हान्समध्ये त्यासाठी आवश्यक सामानाची खरेदीही करतात.

या उत्सवाला दरवर्षी साधारण ५ हजार लोक येतात आणि आपली दफनपेटी निवडतात. माप पाहण्यासाठी त्यात झोपून पाहतात. कलाकुसर पाहतात आणि आवडली तर पेटी बुक करून टाकतात. दफन करतेवेळी मेकअप कसा असावा याचे प्रात्यक्षिक करून दाखवितात, कपडे कुठले घालायचे त्याची निवड करतात आणि त्यासाठी आवश्यक शॉपिंगही करतात.

या उत्सवात अंत्यविधीचे आणि अन्य सामान विक्री करण्यासाठी देशातील ५० बड्या कंपन्या येतात आणि त्यांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसादही मिळतो. आपण स्मार्टफोन विक्री सुरू होणार म्हटल्यावर जसे प्री बुकींग करतो तसे प्री बुकींग अंत्यविधी सामानासाठी या कंपन्यांकडे केले जाते असेही सांगितले जाते.

Leave a Comment