टायर टू शहरांकडे आयटी उद्योगांची विस्तारासाठी नजर

ahmadabad
येत्या काळात आपल्या व्यवसाय विस्तारासाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या अहमदाबाद, जयपूर, कोची, भुवनेश्वर, कोईमतूर, विशाखापट्टणम, चंदिगढ, इंदोर या शहरांना अधिक प्राधान्य देतील असे नॅसकॉम आणि ग्लोबल प्रॉडक्ट कन्सल्टन्ट कंपनी कुशमन अॅन्ड वेकफिल्डच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. ही शहरे या कंपन्यांना व्यवसाय विकासासाठी चांगली संधी आहेत कारण येथे व्यवसायपूरक वातावरण, टॅलंट, पायाभूत सुविधा आणि तुलनेने स्वस्त जीवनमान उपलब्ध आहे.

सध्याच्या टायर वन शहरांनंतर या कंपन्यांची सर्वाधिक पसंती अहमदाबादला आहे. गेल्या पाच वर्षात या शहरात अनेक सुधारणा झाल्या आहेत. हे शहर रस्ते, विमानसेवेने अन्य शहरांशी जोडलेले आहे तसेच येथे चांगल्या प्रतीच्या पायाभूत सुविधाही आहेत. प्रस्तावित मेट्रो, दिल्ली मुंबई कॉरिडॉरवर असलेले स्थान ही त्याची आणखी जमेची बाजू आहे. कोचीत कॉस्ट सेव्हींग या कंपन्यांसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण येथे २५ टक्के कॉस्ट सेव्हींगची संधी आहेच पण त्याचबरोबर सबमरीन कम्युनिकेशन केबल्समुळे इंटरनेटचा स्पीडही खूपच अधिक आहे. गेल्या पाच वर्षात या शहराचा निर्यात महसूल तीनपट वाढला आहे.

कोलकाता, भुवनेश्वर आणि इंदोर शहरात कुशल मनुष्यबळ, अभियंते यांची उपलब्धता मुबलक आहे. भुवनेश्वर मध्ये राज्य सरकारने गुंतवणुकीसाठी अनेक सुविधाही देऊ केल्या असल्याने कंपन्यांचा या शहरांकडे ओढा असल्याचे या अहवालात नमूद केले गेले आहे. जयपूर दिल्लीला जवळ, तुलनेने स्वस्त राहणीमान आणि अन्य शहरांशी कनेक्टिव्हीटी यामुळे कंपन्यांच्या विचाराधीन आहे.

Leave a Comment