मंगळ मोहिमेचे काऊंट डाऊन सुरु; उरले ४ दिवस…

mars
बंगळुरू – मंगळ ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) अवकाशात पाठविलेल्या यानाचा आतापर्यंतचा प्रवास निर्धारित उद्दिष्टप्राप्तीच्या दिशेने योग्यप्रकारे होत असून, आता प्रत्यक्ष कार्याला सुरुवात करण्याची वेळ अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली असून, इस्रोने यासाठी जय्यत तयारी सुरू केली असून भारताचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मार्स आर्बिटर मिशनचा मंगळ ग्रहाच्या कक्षेतील प्रवेश अनुभवण्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ सप्टेंबरला येथील अंतराळ संशोधन संस्था (इसरो)मध्ये उपस्थित राहणार आहेत.

इस्रोने अवकाशात सोडलेले मंगळयान सध्या पृथ्वीपासून २१७ दशलक्ष किमी अंतरावर असून, सध्या ते २२ किमी प्रतिसेकंद या वेगाने प्रवास करत आहे. जेव्हा हे यान मंगळापर्यंत पोहोचेल तेव्हा हाच वेग पाच किमी प्रतिसेकंद इतका कमी होईल. या वेगाने हे यान एका कोनातून मंगळाच्या बाजूने सूर्यमालेच्या बाहेरच्या भागाकडे जाईल. मंगळाच्यादृष्टीने यानाचा वेग आणखी कमी म्हणजे ४.३ किमी प्रतिसेकंद करण्यात येईल. यान पुनर्निर्धारित आणि विरुद्ध बाजूने इंजिन सुरू करून असे करण्यात येईल.

हे लिक्विड ऍपोजी मोटारचे (एलएएम) काम असून, कक्षा बदलताना इस्रोने यानातच एलएएमची चाचणी घेतली आहे आणि येत्या सोमवारी पुन्हा याची चाचणी केली जाणार आहे. एलएएमला दोन व्हॉल्व असतात आणि वायरच्या दोन स्वतंत्र कॉईलच्या माध्यमातून त्याचे नियंत्रण केले जाते. दोन्ही कॉईल एकाचवेळी काम करतात तेव्हा इंजिनाला होणारा इंधन पुरवठा बंद होतो. मात्र, आळीपाळीने काम केल्यास इंजिन व्यवस्थित काम करते. असे असले तरी या अभियानात कोणतीही समस्या येणार नाही, असा इस्रोला ठाम विश्‍वास आहे.

Leave a Comment