भाजपसेना युती अभंग- जागावाटपावर आज निर्णय

bjp (1)
मुंबई – तुटणार तुटणार अशी चर्चा असलेली भाजप शिवसेना युती अभंग राहणार असल्याचे काल सायंकाळी स्पष्ट झाले आहे मात्र जागावाटपाचा तिढा अजूनही कायम असून त्यावर आज होणार्‍या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते.

सेनेतर्फे भाजपला मित्रपक्षांसह ११९ जागा देण्याचा ठेवलेला प्रस्ताव भाजपने धुडकावला होता तर आम्ही एक पाऊल पुढे टाकले आहे आता सेनेने एक पाऊल पुढे यावे असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सुनावले होते. मात्र सेनेचा प्रस्ताव मान्य करण्यास भाजपने ठाम नकार दिल्यानंतर सेना नेते एक पाऊल समझोत्याच्या दिशेने पुढे आले. भाजपचे नेते एकनाथ खडसे याच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत भाजपचे प्रभारी ओम माथूर याच्याबरोबर सेनेचे नेते आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाईही सामील झाले आणि तेथेच युती अभंग ठेवली जाईल याचा निर्णय घेतला गेला.

आता भाजप आणि सेना दोघेही परस्परांच्या पक्षात चेंडू असल्याचे सांगत आहेत मात्र दोन्ही पक्षांनी नक्की काय प्रस्ताव दिला हे गुलदस्त्यातच आहे. यावर ओम प्रकाश माथूर भाजप नेते आणि सेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या बरोबर आज पुन्हा चर्चा करणार असून त्यातून जागावाटपावर तोडगा काढला जाईल असे समजते. भाजपने १३५ ऐवजी १३० जागांवर सहमती दर्शविली आहे तर सेना अजूनही जागा वाढवून द्यायला तयार नाही असे अंतर्गत सूत्राकडून समजते. मात्र दोन्ही पक्षांनी मिशन १५० हे कायम असल्याचे सांगितले आहे.

Leave a Comment