मुंबई – इंग्लंड दौ-यात ऑफ स्टम्प बाहेरचे फटके मारतानाच जास्तवेळा बाद झालेला विराट कोहली याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरकडे धाव घेतली असून विराट कोहलीने मुंबईतच आजपासून सचिनचे मार्गदर्शन घेण्यासाठी मुक्काम ठोकला आहे. विराटसोबत युवराजसिंगही बी.के.सी. येथे इनडोअर प्रशिक्षण केंद्रावर दाखल झाला होता. पाठोपाठ प्रवीण आमरेचे मार्गदर्शन घेण्यासाठी रॉबिन उथप्पा, नमन ओझा, दिनेश कार्तिक हेदेखील दाखल झाले आहेत. अजिंक्य रहाणे मुंबई रणजी संघासोबत या आधीपासूनच प्रवीण आमरे यांच्याकडून आगामी मालिकेसाठी काही ‘टिप्स’ घेत आहे.
विराट आणि युवराज घेणार मास्टरब्लास्टरचे मार्गदर्शन
सचिन तेंडुलकर आज सकाळपासूनच विराट कोहलीच्या विनंतीवरून बीकेसी येथील एनसीए इनडोअर प्रशिक्षण केंद्रावर हजर होता. बीसीसीआयच्या सराव नेट्सचे मुंबईतील प्रमुख लालचंद राजपूत यांनी विराटला सरावासाठी मुंबईच्या २३ वर्षांखालील क्रिकेट संघांतील तरुण तडफदार वेगवान गोलंदाज दिले. लालचंद राजपूत यांनी मिडल व ऑफ स्टम्पवर ‘गुड लेंग्थ’ स्पॉटवर खडूने दोन रेषा आखल्या आणि गोलंदाजांना त्याच रेषांवर गोलंदाजी करण्यास सांगितले.