डेटाविंड दिवाळीपूर्वी आणणार स्वस्त स्मार्टफोन

data
स्वस्त स्मार्टफोनसाठी नाव असलेल्या डेटाविंड कंपनीने दिवाळीपूर्वी २००० रूपये किमतीचा स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर केला जात असल्याची घोषणा केली असून या फोनसोबत कायमस्वरूपी इंटरनेट सेवा मोफत दिली जाणार आहे.

या संदर्भात अधिक माहिती देताना कंपनीचे उपाध्यक्ष रूपिंदरसिंग म्हणाले, आमच्या कंपनीचे सध्या बाजारात तीन स्मार्टफोन आणि पाच टॅब्लेट आहेत. दरमहा ४० ते ५० हजार युनिट कंपनी विकते आहे मात्र या वर्ष्रअखेर ही विक्री दुप्पट करण्याचे ध्येय कंपनीने ठरविले आहे. नवा स्मार्टफोन ३.५ इंची स्क्रीन आणि अँड्राईड ओएस सह असेल. या फोनसाठी इंटरनेट सुविधा ग्राहकाला कायमस्वरूपी मोफत देण्याचा आमचा प्रयत्न असून त्यासाठी ३ मोबाईल ऑपरेटर कंपन्यांसह बोलणी सुरू आहेत.

कंपनीने भारत सरकारसाठी आकाश टॅब्लेटची १ लाख युनिट २०११ सालात २२७६ रूपये किमतीने दिली होती. भारत सरकारचा शालेय विद्यार्थ्यांसाठी राबविलेला हा उपक्रम होता. मात्र त्यानंतर टॅब्लेटच्या गुणवत्तेबाबत जोधपूर आयआयटीने शंका व्यक्त केल्यानंतर मुंबई आयआयटीने उर्वरित काम पूर्ण केले होते. सरकारने पुन्हा नव्याने आकाश फोर टॅब्लेटसाठी निविदा मागविल्या आहेत आणि त्यात डेटाविंड निविदा भरणार असल्याचेही रूपिंदरसिंग म्हणाले.

Leave a Comment