
अहमदनगर – भाजप आमदार आणि गोपीनाथ मुंडे यांच्या ज्येष्ठ कन्या पंकजा मुंडे-पालवे यांच्या संघर्ष यात्रेचा तब्बल ३००० किलोमीटरचा प्रदीर्घ प्रवास झाल्यानंतर आज अहमदनगर जिल्ह्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चौंडी इथे ही यात्रा समाप्त होणार आहे.
३००० किलोमीटरच्या प्रदीर्घ प्रवासानंतर संघर्ष यात्रेचा आज समारोप
भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यासह पक्षातील अनेक बडे नेते पंकजांच्या या संघर्ष यात्रेच्या समारोपाला उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने जिल्ह्यातील कार्य़कर्त्यांना जमवून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याचे जिल्हा कार्य़करिणीने ठरविले आहे. तसेच यावेळी पक्षाध्यक्ष अमित शहा पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.
सिंदखेडराजापासून सुरू केलेल्या आपल्या संघर्ष यात्रेला सुरुवात करणाऱ्या आमदार पंकजांनी महाराष्ट्रातील जवळपास २१ जिल्ह्यांना भेट दिली आहे. तसेच ७९ मतदारसंघातील मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनीही आपल्या राजकीय कारकीर्दीच्या सुरूवातीला संघर्ष यात्रा केली होती. पित्याच्याच पावलावर पाऊल ठेवत आमदार पंकजा मुंडे पालवे यांनीही संघर्ष यात्रा काढून जनतेचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.
