शहांनी शिवसेनेला ठणकावले, युती सन्मानपूर्वक हवी

amit-shah
कोल्हापूर- भाजप दोन पाऊल पुढे आली आहे. आता मित्रपक्षानेही दोन पाऊल पुढे यावे. युती सन्मानपूर्वक असली पाहिजे तरच कार्यकर्त्यांचे समाधान होईल, असे आवाहन भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेला आज (गुरुवार) सकाळी कोल्हापूरात केले आहे. अमित शहा हे आज सकाळी नऊ वाजता कोल्हापूरात दाखल झाले. शहांचे विमानतळावर स्वागत केल्यानंतर त्यांनी छोटेखानी सभा घेतली त्यावेळी ते बोलत होते.

विधानसभा निवडणुका तोंडावर असतानाही भाजप-शिवसेनेमधील जागावाटपावरून असलेले मतभेद संपलेले नाहीत. त्यामुळे तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौ-यावर आलेल्या शहा यांनी कोल्हापुरातील सभेत नरमाईची भाषा करत जागावाटपाबाबत सूचक वक्तव्य केले. या सभेत शहा यांनी आघाडी सरकारवर टीका केली.

आघाडी सरकारमुळे तिजोरीत खणखणाट झाला असून आता महाराष्ट्रात परिवर्तनाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने एकजूट होऊन सरकार बदलण्यासाठी प्रयत्न करावा, सर्वांनी संघर्षासाठी तयार रहा आणि आघाडी सरकार उलथवून लावा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

परंतू अद्याप युतीचा तिढा सुटला नसल्याने पहिले आपल्या घरातले वाद मिटवा, मग सरकार उलथवायचे बघू, अशा प्रतिक्रिया बुचकळ्यात पडलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.

Leave a Comment