लोकल कुरीअर

courier
भारतात साधारण २५ वर्षांपूर्वी कुरीअर सेवा हा प्रकार फार प्रचलित झाला नव्हता. परंतु आता अनेक संस्था, संघटना, व्यापारी प्रतिष्ठाने आपला पत्रव्यवहार सरसकट कुरीअर सेवेच्या मार्फत करत आहेत. सरकारच्या टपाल सेवेचा वापर करणार्‍यांची संख्या वरचेवर कमी होत चालली आहे. आपल्या देशात अर्थव्यवहाराला मोठी गती आल्यामुळे पत्रव्यवहाराचे प्रमाण खूप वाढलेले आहे. परंतु ही व्याप्ती सरकारच्या टपाल सेवेला झेपत नाही. त्यामुळे सरकारची सेवा दिरंगाईची झाली आहे आणि त्याचाच फायदा घेऊन गावागावांमध्ये कुरीअर सेवा चांगल्याच फोफावल्या आहेत. विविध कुरीअर सेवा आपापसात चांगला समन्वय साधून टपालाची देवाणघेवाण करतात आणि अतीशय त्वरेने ग्राहकांची पत्रे, पार्सले पुढच्या गावात नेऊन ग्राहकांच्या घरापर्यंत नेऊन देतात. अर्थात बिनभांडवली उद्योग या सदरात आपल्याला या मोठ्या प्रमाणावरील कुरीअर सेवेचा विचार करायचा नाही. कारण तो एक तर बिनभांडवली नाही आणि त्यासाठी फार मोठी यंत्रणा उभी करावी लागते. तेव्हा आपण सुशिक्षित बेकारांना भांडवल न गुंतवता करता येण्याजोगे उद्योग सुचवत आहोत, त्यात कुरीअर सेवा बसत नाही. मात्र या कुरीअर सेवेचाच लहान अवतार आपल्या डोळ्यासमाेर ठेवलेल्या सुशिक्षित बेकारांच्या आवाक्यात बसणारा आहे.

तो अवतार म्हणजे लोकल कुरीअर. ही कुरीअर सेवाच आहे, पण स्थानिक पातळीवर आणि छोट्या प्रमाणात काम करणारी आहे. तिच्यासाठी फार मोठी गुंतवणूक करण्याची गरज नाही. आपल्या गावातलीच पत्रे गावातल्या गावात वाटण्यासाठी ही सेवा कार्यरत असते. सध्या लोकांना त्यांच्या व्यापामुळे आपल्या घरच्या लग्नाच्या पत्रिका किंवा तत्सम समारंभाच्या निमंत्रण पत्रिका वाटण्यास वेळ नाही. अशा गावातल्या गावात वाटावयाच्या पत्रिका लोकल कुरीअर मार्फत वाटता येतात. केवळ पत्रिकाच नव्हे तर अनेक संस्था संघटनांची परिपत्रके, नोटीसा याही त्यांच्या सदस्यांना वाटावयाच्या असतात. रोटरी क्लब, लायन्स क्लब यासारख्या संघटना आपल्या दर आठवड्याला होणार्‍या बैठकीची निमंत्रणे आपल्या सदस्यांपर्यंत लेखी पोचवत असतात. मात्र अशा संघटनांच्या पदाधिकार्‍यांना ही कामे कोणाकडून तरी करून घ्यायची असतात. अशावेळी लोकल कुरीअर सेवा त्यांना उपयोगी पडते. रोटरी किंवा लायन्स सारख्या कित्येक संघटनांना अशा सेवेची आवश्यकता भासत असते. त्यांच्याकडून पत्रामागे दोन किंवा तीन रुपये एवढे नाममात्र शुल्क घेऊन लोकल कुरीअर चालवणारे लोक त्यांना सेवा देतात.

या सेवेसाठी आवश्यक असलेली एक गोष्ट म्हणजे लोकांना संपर्क साधण्यासाठी एखादे ठिकाण. ते ठिकाण म्हणजे भर बाजारात किंवा मोक्याच्या जागेवर असणारे कार्यालय असलेच पाहिजे असे नाही. आपण ज्यांना सेवा देणार आहोत त्यांनी आपली परिपत्रके किंवा पत्रे आपल्याला आणून द्यायची आहेत. त्यासाठी आपण आपल्या घराचा पत्ता दिला तरी काही बिघडत नाही. म्हणजे कार्यालयासाठी किंवा ऑफिससाठी वेगळी गुंतवणूक करण्याची गरज नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे अनेक लोकांची नावे आणि त्यांचे पत्ते यांची अद्ययावत यादी पाहिजे. म्हणजे आपली सेवा घेऊ इच्छिणार्‍यांना केवळ ती यादी बघून त्यावरच्या नावावर खूण केली की त्यांना पत्र नेवून देण्याची जबाबदारी आपली असते. म्हणजे सेवा घेऊ इच्छिणार्‍यांनी नावाची आणि पत्त्यांची यादी आपल्याला देण्याची गरज असू नये. रोटरी क्लब, लायन्स क्लब, मेडिकल असोसिएशन, निरनिराळ्या व्यापारी संघटना, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांच्या नावांच्या आणि त्यांच्या पत्त्यांच्या याद्या त्या संघटनांकडे तयारच मिळतात. त्या मिळवून त्यांचे पत्ते समजून घेतले पाहिजेत. हे काम जेवढे अद्ययावत आणि व्यवस्थित असेल तेवढी कुरीअर सेवा अधिक कार्यक्षमपणे चालते आणि कमी माणसात कमी वेळात अधिक पत्रे वितरित होतात.

या सेवेमध्ये एक फायदा असा आहे की, पत्र किंवा पत्रिका योग्य त्या व्यक्तीला दिली की त्या व्यक्तीची पत्र पोचल्याची स्वाक्षरी घेतली जाते आणि आपण योग्य त्या व्यक्तीला पत्र पोचवले आहे हे आपल्या ग्राहकाला दाखवता येते. हा व्यवसाय विश्‍वासावर आधारलेला आहे आणि तो सिद्ध केला पाहिजे. या व्यवसायाला वरचेवर अधिक संधी निर्माण होत आहेत. कारण शहरे वाढत आहेत आणि कार्यक्रमांची संख्याही वाढत चालली आहे. संस्थांची संख्याही वाढत आहे आणि त्यांना पत्रे पोचवायला वेळ नाही. अशा शहरांमध्ये या सेवेची फारच गरज आहे आणि त्यापासून मिळणारी प्राप्तीही चांगली असते. परंतु लोकांच्या घरापर्यंत जाऊन पत्रे वितरित करण्याचे कष्ट करण्याची तयारी पाहिजे. तेच या धंद्यातले खरे भांडवल आहे. मात्र वाहने उपलब्ध असतील तर ही गोष्ट फार अवघड नाही. पत्रामागे दोन किंवा तीन रुपये असा मेहनताना घेतला जातो, परंतु एकाच वेळी दोन किंवा तीन संस्थांची पत्रे घेऊन बाहेर पडलोे की, एकाच चकरेत तिप्पट काम होते. साधारण दोन ते तीन लाख वस्तीच्या गावात असा व्यवसाय करणार्‍या सुशिक्षित तरुणाला महिन्याला १५ ते २० हजार रुपयांची प्राप्ती होणे अशक्य नाही.

Leave a Comment