राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात उमेदवारांची वानवा

ncp
पिंपरी: पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पिंपरी चिंचवडवर एकहाती सत्ता आहे. मात्र मोदी लाटेत पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप शिवसेना युतीच्या उमेदवाराला तब्बल दोन लाखाचे मताधिक्य मिळाल्याने ‘राष्ट्रवादी’चे धाबे दणाणले आहे. मुख्यमंत्र्यांनी कामे न केल्याचे खापर फोडून दादा समर्थक आमदारच ‘राष्ट्रवादी’पासून दूर पळू पहात आहेत.
पिंपरी चिंचवडमध्ये पिंपरी, चिंचवड आणि भोसरी तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. तीनही ठिकाणी राष्ट्रवादीचे विलास लांडे, अण्णा बनसोडे आणि लक्ष्मण जगताप निवडून आले आहेत. यापैकी चिंचवड मतदारसंघ वास्तविक काँग्रेसकडे होता. मात्र अजित पवार यांनी लक्ष्मण जगताप यांना बंडखोरी करायला भाग पाडले आणि त्यांना निवडूनही आणले.

पिंपरी चिंचवड मतदारसंघातील निर्विवाद वर्चस्वाच्या जोरावर या निवडणुकीत पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही जागा ‘राष्ट्रवादी’च लढविणार असे आपला सहयोगी पक्ष असलेल्या काँग्रेसला सुनावले. मात्र या पाच वर्षात पिंपरी चिंचवडमधील बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा प्रश्न, गुंठेवारी असे अनेक प्रश्न प्रलंबित राहिले. या प्रश्नांबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. याचा फटका लोकसभा निवडणुकीत सत्ताधा-यांना बसला. त्यामुळे या प्रलंबित प्रश्नांना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जबाबदार असल्याचे विद्यमान आमदार सांगतात या प्रलंबित प्रश्नांबरोबरच वाढते गुन्हे, असुरक्षितता यामुळे सत्ताधा-यांबद्दल जनतेच्या मनात असलेल्या तीव्र संतापाची कल्पना विद्यमान आमदारांना आहे. त्यामुळे त्यांना ‘राष्ट्रवादीच्या घड्याळावर लढण्याची धास्ती वाटत आहे. त्यामुळे या निवडणुकीत मात्र या दादा समर्थक आमदारांपैकी कोणी भारतीय जनता पक्षाच्या वळचणीला जाऊ पाहत आहे; तर कोणी अपक्ष लढण्याची तयारी करीत आहे. मात्र याबाबत कोणीही स्पष्ट बोलण्यास तयार नाही. कार्यकर्त्यांचे विचार लक्षात घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल; असे उत्तर आमदार देत आहेत. या असंतोषामुळे एरवी अजित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवडमधील निवडणुकांबाबत औत्सुक्य निर्माण झाले आहे.

Leave a Comment