महायुती आणि आघाडीसमोर घरभेद्यांचे आव्हान

vidhan-sabha
पुणे: पुणे लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला घवघवीत यश तरीही विधानसभा निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती होईल; याची खात्री येत नाही. सहापैकी तीन मतदारसंघात महायुतीकडे प्रबळ उमेदवारच नाही. मात्र अजूनही मोदी लाटेवर तरंगणा-या महायुतीच्या नेत्यांना वस्तुस्थितीची पुरेशी जाणीव असल्याचे दिसत नाही. सत्तेसाठी एकत्र असलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस प्रत्यक्षात एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. काँग्रेसमधील गटबाजी नेहेमीप्रमाणेच सुखनैव सुरूच आहे. त्यामुळे महायुती आणि आघाडी या दोघांनाही पुण्यातील ६ मतदारसंघात मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे.

पुणे हा सदाशिव, नारायण, शनिवार पेठांचा अपवाद वगळता काँग्रेस विचारांना बळ देणारा बालेकिल्ला आहे. मात्र राष्ट्रकुलदीपक खासदार सुरेश कलमाडी यांच्यानंतर शहर काँग्रेसचे समर्थपणे नेतृत्व शकेल; असा नेता काँग्रेसकडे नसल्याने काँग्रेसच्या निर्विवाद वर्चस्वाला सुरुंग लागला आहे. सलग दोन वेळा ‘राष्ट्रवादी’ने महापालिका हस्तगत केली आहे. मोदी लाटेच्या प्रभावाखाली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय पक्षाचा उमेदवार तब्बल ३ लाख १५ हजारांच्या आघाडीने निवडून आला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सर्व मतदारसंघात विजय प्राप्त करण्याची स्वप्ने महायुतीच्या नेत्यांना पडू लागली आहेत. मात्र हे आव्हान खूपच मोठे ठरणार आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघ हा युतीचा बालेकिल्ला आहे. भाजपचे गिरीश बापट सलग वेळा या मतदारसंघातून निवडून गेले आहेत. यावेळीही निवडून येण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. मात्र पक्षांतर्गत गटबाजीचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. कसबा मतदारसंघात आता बदल हवा; अशी भावना पक्षातील कार्यकर्तेच उघडपणे मांडू लागले आहेत. त्यामुळे तिकीट मिळविण्यासाठी त्यांना झगडावे लागेल आणि उमेदवारी मिळाल्यानंतरही दगा फटका टाळण्यासाठी त्यांना सावध रहावे लागेल. मागच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी लक्षणीय मते घेऊन बापट यांच्या नाकी नऊ आणले होते. त्याचप्रमाणे काँग्रेसचे उमेदवार रोहित टिळक यांनीही त्यावेळी चांगली लढत दिली होती. यावेळीही बापट यांच्यासमोर पुन्हा धंगेकर आणि टिळक यांचे आव्हान असणार आहे. पर्वती मतदारसंघावर दावा करण्यासाठी कसबा मतदारसंघ राष्ट्रवादीला दिला जाण्याची शक्यता आहे.
कोथरूड मतदारसंघावर दीर्घकाळ युतीचे वर्चस्व राहिले आहे. मात्र मागील निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार शिंदे यांनी आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले. त्यामुळे मोकाटे यांना निसटत्या विजयावर समाधान मानावे लागले. आघाडीमध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असून त्यांच्या उमेदवाराचा शोध जारी आहे.

शिवाजीनगर हा पुण्यातील बहुचर्चित विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघाचे विद्यमान आमदार उद्योगमंत्री नारायण राणे यांचे कट्टर समर्थक विनायक निम्हण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यासाठी जंग जंग पछाडले. मात्र स्थानिक भाजप नेत्यांच्या ठाम विरोधामुळे त्यांच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे. या निवडणुकीतही ते रिंगणात असणारच आहेत. मात्र ते कोणत्या पक्षाच्या चिन्हावर लढतात; यावरच या मतदारसंघातील समीकरण ठरणार आहे.

पर्वती मतदारसंघात महायुतीची बाजू अधिक प्रबळ आहे. या मतदारसंघात भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या होत्या. यावेळी महायुतीत रिपब्लिकन पक्ष (ए) समाविष्ट त्याचा फायदा मिसाळ यांना मिळणार आहे. आघाडीत मात्र या मतदारसंघांवरून साठमारी सुरू आहे. मागील वेळी हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे होता. यावेळी कॉंग्रेसने त्यावर दावा केला आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड, माजी महापौर कमल व्यवहारे आणि नगरसेवक आबा बागूल या मतदारसंघातून लढण्यास उत्सुक आहेत. मात्र उपमहापौर पद देऊन बागूल यांचा दावा पक्षाने थंड केल्याचे आहे. राष्ट्रवादीचे महापालिकेतील गटनेते सुभाष जगताप हे देखील आपल्या उमेदवारीबाबत आग्रही आहेत.

केण्टोन्मेण्ट हा मतदारसंघ नेहेमी काँग्रेसची पाठराखण करीत आला आहे. विद्यमान आमदार रमेश बागवे या निवडणुकीतही रिंगणात असणार आहेत. महायुतीत ही जागा रिपब्लिकन पक्षाच्या वाट्याला येऊ शकते. तसे झाल्यास पक्षाचे ज्येष्ठ नेते परशुराम वाडेकर हे या मतदारसंघात बागवे यांच्यासमोर कडवे आव्हान उभे करू शकतात.

वडगाव शेरी या मतदारसंघात नात्यागोत्याच्या राजकारणाचे त्या जोरावर मागील निवडणुकीत झालेले आमदार बापू पठारे यांचे या मतदासंघावर निर्विवाद वर्चस्व आहे. या निवडणुकीतही राष्ट्रवादीकडून पठारे हेच रिंगणात असणार आहेत. महायुतीत शिवसेनेकडे असलेल्या या मतदारसंघात उमेदवाराची वानवा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतून ‘आयात’ केलेले सुनील टिंगरे यांच्या गळ्यात सेनेची उमेदवारी पडू शकते. टिंगरे मात्र सध्या सेना आणि मनसे असे दोन्ही पर्याय चाचपून पहात आहेत.

Leave a Comment