सी-लिंकवर ८० सीसीटीव्हीची करडी नजर

sea-link
मुंबई – वांद्रे-वरळी सी-लिंक आत्मत्यांसाठी हॉट फेव्हरिट ठरत असून यासाठी ८० सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सी-लिंकवर सध्या केवळ १० कॅमेरे आहेत.

मुंबईजवळील समुद्रातील संशयास्पद हालचालींवर देखरेख ठेवण्यासाठी तसेच वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी हे विशेष कॅमेरे बसवण्यात येणार असल्याचे मुंबई एंट्री पॉइंट इन्फ्रास्ट्रक्र डेव्हलपमेंट (एमइपीआयडी) आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरण (एमएसआरडीसी) यांनी उच्च न्यायालयात सांगितले.

सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांच्या सी-लिंकवरील आत्महत्या आणि सी-लिंकच्या सुरक्षेबाबत जनहित याचिकेवर सुनावणी सुरू आहे. मागील काही महिन्यांत सी-लिंकवर आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. तसेच दहशतवादी हल्ल्याचा धोका लक्षात घेता सागरी सुरक्षाही अपुरी पडत असल्याचे तिरोडकर यांनी याचिकेत म्हटले आहे.

वांद्रे वरळी सी-लिंकवर टोल वसुली करणाऱ्या मुंबई एंट्री पॉइंट लिमिटेड या कंपनीने ८० कॅमेरे बसवण्यात येणार असल्याचे सांगितले. कॅमेरे खरेदीची प्रक्रिया सुरू असून लवकरच हे कॅमेरे बसवण्यात येतील असे कंपनीने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

सागरी सुरक्षेच्या प्रश्नासंबंधी समुद्रातील हालचालींवर देखरेख ठेवणाऱ्या प्रणालीबाबत एमएसआरडीसीने असमर्थता व्यक्त केली. मात्र, यासाठी सी-लिंकवर कॅमेरे लावून समुद्रातील संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे एमएसआरडीसीने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी दोन आठवडय़ानंतर ठेवण्यात आली आहे.

Leave a Comment