सत्तेसाठी कायपण! भाजप, राष्ट्रवादीची हातमिळवणी?

ncp
मुंबई – राज्यातील महत्वाच्या पक्षांचा जागा वाटपाचा वाद विकोपाला गेल्याने सर्वच पक्ष स्वबळावर लढण्याची भाषा करु लागल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पंचरंगी लढत पहायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजप शिवसेनेची युती तुटल्यास राज्यात सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी भाजपला मदत करण्याची शक्यता आहे. देशासह महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ही खळबळजनक बाब आहे.

सध्या महायुतीची अवस्था टिकणार की तुटणार, अशी झाली आहे. तर, आघाडीमध्येही जागावाटपामुळे बिघाड झाला आहे. शिवसेना आणि भाजप यांची २५ वर्षांची युती तुटल्यास राष्ट्रवादी काँग्रेसदेखील स्वबळावर लढणार आहे.

भाजपने जर, १०० जागांवर विजय मिळवला तर, सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील. राज्यात भाजप आणि राष्ट्रवादीचे सरकार आल्यास केंद्रातही काही महत्वपूर्ण बदल होतील. राष्ट्रवादीने राज्यात भाजपला पाठिंबा दिला म्हणून राष्ट्रवादीला केंद्रात मंत्रिपद दिले जाईल. अशी माहिती राष्ट्रवादीच्या अतिवरिष्ठ सूत्रांकडून मिळाली.

सत्ता समीकरणांच्या या नव्या गणितांचे राज्याच्या राजकारणावर दुरागामी परिणाम होऊ शकतात. तब्बल २५ वर्षांनंतर राज्यातले पाच प्रमुख पक्ष म्हणजे काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप आणि रिपाइं स्वबळावर लढतील अशी स्थिती आहे. तब्बल २५ शतकानंतर महाराष्ट्रात पंचरंगी लढत होवू शकते.

Leave a Comment