शुक्रवारी होणार युतीबाबत निर्णय

udhav
मुंबई – पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी येत्या शुक्रवारी शिवसेनेच्या राज्यातील सर्व बड्या नेत्यांना मुंबईत बैठकीस पाचारण केले असून यात नेते, उपनेते, जिल्हाप्रमुख, संपर्क नेते आदी सर्व स्तरातील नेत्यांचा यात समावेश असेल. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी भाजपसोबतची युती तोडण्याचे यातून स्पष्ट संकेत दिल्याचे मानण्यात येत आहे. आज सकाळी महायुतीतील घटकपक्ष असलेल्या आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी शिवसेनेने वेगळे लढू नये असे वक्तव्य केल्याने शिवसेना शुक्रवारी मोठा निर्णय घेईल, असे सांगण्यात येत आहे.

१३५ जागांवर भाजप ठाम असून शिवसेनेनेही १५० पेक्षा एकही कमी जागा लढविणार नाही असे ठणकावून सांगितले आहे. त्यातच उद्धव ठाकरेंनी काल भाजपला १३५ जागा देणे केवळ शक्य नसून मित्रपक्षाला हे मान्य असेल तर ठीक अन्यथा इतर पर्याय उपलब्ध आहेत असे म्हटले होते. यानंतर भाजप आक्रमक आहे व स्वबळाची भाषा करीत असल्यामुळे उद्धव ठाकरे भाजपच्या वर्तणूकीला आता कंटाळले आहेत. ऐन वेळीत भाजप स्वबळाची भाषा करेल किंवा जागावाटपांत नमते घेतले तरी शिवसेनेच्या उमेदवारांविरोधात कटकारस्थान रचून भाजपपेक्षा शिवसेनेच्या जागा कमी कशा येतील यासाठी खेळी करेल अशी भीती शिवसैनिकांना वाटत असल्यामुळे अनेक शिवसैनिक व नेते भाजपशिवाय लढण्याचा विचार बोलून दाखवत आहेत. महायुतीतील काही घटकपक्षांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जावे असे काही नेत्यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment