‘मातोश्री’वरून आले आठवलेंना बोलावणे

mahayuti
मुंबई- दिवसेंदिवस महायुतीतील जागावाटपाचा गुंता सुटण्याऐवजी वाढत चालल्याचे चित्र असून याच पार्श्वभूमीवर स्वबळाच्या चाचपणीला शिवसेनेने सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून घटकपक्षांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न सुरु केला आहे.

उद्धव यांनी आज सकाळी आरपीआयचे नेते रामदास आठवले यांना मातोश्रीवर बोलवून घेतले आहे. यावेळी महायुती झाल्यास कसा फॉर्म्यूला असेल याची माहिती दिल्याचे कळते. तसेच स्बबळावर लढायचे झाल्यास आपली भूमिका काय असेल याबाबत आठवलेंना माहिती देण्यात आली आहे. भाजप व सेना वेगळी लढल्यास आठवलेंचा कल कोणाच्या बाजूने असेल याची चाचपणी उद्धव ठाकरे करीत आहेत.

दरम्यान, आठवले यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी युतीत आणल्यामुळे आठवलेंचा कल शिवसेनेच्या बाजूने असेल असे बोलले जात आहे. भाजपने आठवलेंना राज्यसभेत पाठवले असल्याने व केंद्रात त्यांना भाजपच्या कोट्यातून मंत्रिपद हवे आहे. मात्र, भाजप ते देण्यास तयार नसल्याचे कळते आहे. आम्ही राज्यसभेत पाठवले आहे आता सेनेच्या कोट्यातून मंत्रिपद मिळवावे असे भाजपच्या नेत्यांना आठवलेंना सल्ला दिला आहे.

Leave a Comment