भारतीय महिलांसाठी वेअरेबल गॅजेट आणणार इंटेल

intel
इंटेल या चीपमेकर कंपनीने गेल्याच आठवड्यात स्मार्टवॉच सारखी वेअरेबल डिव्हायसेस बाजारात आणण्यासाठी फॅशन अॅक्सेसरीजसाठी प्रसिद्ध असलेल्या रिटेलर फॉसिल्स ग्रुपशी सहकार्य करार केला आहे. यातून निर्माण केली जाणारी वेअरेबल डिव्हायसेस भारतातही उपलब्ध करून दिली जाणार आहेत आणि खास भारतीय महिलांची आवड लक्षात घेऊन ती बनविली जाणार आहेत.

कंपनीच्या द.आशिया विभागाच्या व्यवस्थापकीय संचालक देवयानी घोष या संदर्भात माहिती देताना म्हणाल्या की आम्ही खास महिलांना टार्गेट करण्यावर अधिक भर देतो आहोत. जर भारतीय स्मार्टफोनसाठी तयार आहेत तर ते वेअरेबल डिव्हायसेस यासाठी तयार असणारच. भारतात महिलांची सुरक्षा हा राष्ट्रीय चिंतेचा विषय आहे. यामुळे महिलांना फॅशनही आणि सुरक्षेचे एक साधन म्हणून अशा वेअरेबल अॅक्सेसरीज उपयुक्त ठरू शकतात हे लक्षात घेऊन आम्ही अशी डिव्हायसेस बाजारात आणणार आहोत.

महिलांच्या कपड्यांना सहसा खिसे नसतात. त्यामुळे त्या सदैव स्मार्टफोन बरोबर बाळगू शकत नाहीत. मात्र बांगडी, घड्याळ अशा अॅकसेसरीज नियमित वापरू शकतात त्यामुळे याच अक्सेसरीज त्यांना एक डिव्हाईस म्हणून कशा वापरता येतील याचा विचार केला जात आहे. यात पॅनिक परिस्थिती उद्भवलीच तर एखादे बटण दाबून महिला आपण संकटात आहोत हे सांगू शकतील. जगात इंटेलचे अशा अक्सेसरीज बनविणार्‍या कंपन्यांशी टायअप आहेत. भारतातही या अॅकसेसरीज लोकप्रिय ठरतील असा आम्हाला विश्वास आहे.

भारतीय बाजारात आज नायके , सॅमसंग यांच्या रिस्ट बँड, स्मार्ट वॉच सारख्या अॅक्सेसरीज आहेत मात्र त्या सर्वसामान्य ग्राहकाला परवडणार्‍या किंमतीत नाहीत. भारतीय ग्राहक हा किमतीचा विचार करणारा असल्याने तशा प्रकारच्या अर्क्सेसरीज बनविण्याचा आमचा प्रयत्न आहे असेही त्यानी सांगितले.

Leave a Comment