दोन दिवसांत निर्णय घ्या – सेनेला भाजपचा इशारा

bjp
मुंबई – निवडणुकांच्या तोंडावर अद्यापीही शिवसेना भाजप जागा वाटपाचा तिढा कायम राहिला असला तरी भाजपने सेनेला या बाबतीत अल्टीमेटमच दिला असून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. समसमान जागांवर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने सहमती दर्शविली आहे मात्र सेनेची त्याला तयारी नाही. मुख्यमंत्रीपदावरून सेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानामुळे परिस्थिती आणखीनच बिघडत चालली असल्याचे अनुभवास येत आहे.

भाजपचे महाराष्ट्रासाठीचे निवडणूक प्रभारी राजीवप्रताप रूडी यांनी भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा निर्णय जागावाटपात अंतिम ठरणार असल्याचे व ते मुंबईत १७ सप्टेंबरला येणार आहेत त्यापूर्वी सेनेने निर्णय घ्यावा असा इशारा सेना नेत्यांना दिला आहे. १८ सप्टेंबरला शहा यांच्या अध्यक्षतेसाठी प. महाराष्ट्रातील भाजप पदाधिकार्‍यांची बैठक होत आहे व त्यानंतर शहा पंकजा मुंडे यांच्या संघर्ष यात्रा समारोपासाठी रवाना होणार आहेत. या मुंबई भेटीत शहा ठाकरे भेट होणार नाही असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाने महायुतीच्या घटक पक्षांसाठी १७-१८ जागा सोडण्याची तसेच उर्वरित २७० जागांतील निम्म्या निम्या म्हणजे १३५-१३५ जागा सेना भाजपने लढविण्याच्या निर्णयाला सहमती दर्शविली आहे मात्र सेनेचा या जागावाटपाला कडकडून विरोध असून त्यांना अधिक जागा हव्या आहेत. त्यामुळे युती टिकणार की तुटणार याचा निर्णय येत्या दोन तीन दिवसांत लागेल असे सांगितले जातआहे. भाजपतर्फे त्यांचा हा निर्णय प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सेना नेत्यांना सांगितला आहे आणि आता चेंडू सेनेच्या कोर्टात आहे

Leave a Comment